व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा पुन्हा एकदा रद्द झाला आहे. बोरिस जॉन्सन हे 25 एप्रिलला भारतात येणार होते. त्यांचा हा दौरा अनिश्चित काळासाठी रद्द झाला आहे. मात्र, भारत आणि ब्रिटनच्या संबंधांबाबत ते व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. सध्याचा कोरोनाचा काळ पाहाता पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपला भारत दौरा रद्द केला, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली आहे. यापूर्वी जॉन्सन हे भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 26 जानेवारीला भारतात येणार होते. पण ब्रिटनमध्ये लॉकडाऊन लागल्यानंतर त्यांनी आपला दौरा रद्द केला होता. आता ते या वर्षाच्या अखेरीस ते भारत दौऱयावर येऊ शकतात्। अशी माहितीही त्यांच्या कार्यालयाने दिली आहे.
भारतात कोरोना रुग्णांचा विस्फोट पाहता इतर देशांनी धसका घेतला आहे. कोरोनाच्या विस्फोटामुळेच बोरिस जॉन्सन यांनी दुसऱयांदा भारत दौऱयावर येण्याचे टाळले आहे. सध्याच्या कोरोना स्थितीमुळे हा निर्णय घेतल्याचे ब्रिटन परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बोरिस जॉन्सन यांच्या नियोजित भारत दौऱयाला ब्रिटनमध्ये जोरदार विरोध होत होता. विरोध पक्षांनी जॉन्सन यांच्यावर टीकेची झोड उठवल्यामुळेही त्यांचा दौरा लांबणीवर पडल्याची चर्चा आहे.









