पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटन आणि भारत हे नैसर्गिक भागीदार असून 5जी आणि दूरसंचारविषयक भागीदारीपासून स्टार्टअपपर्यंत अनेक भव्य प्रकल्पांमध्ये एकत्र काम करत असल्याचे उद्गार ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मंगळवारी काढले आहेत. व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून ग्लोबल टेक्नॉलॉजी समिटला त्यांनी संबोधित केले आहे. ग्लोबल मीट्स लोकलच्या थीमवर विदेश मंत्रालयासह स्वयंसेवी संस्था कार्नेगी इंडियाकडून या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले.
आगामी दशकात भारत आणि ब्रिटन तंत्रज्ञान तसेच अन्य क्षेत्रांमधील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करणार आहेत. 2030 च्या सालापर्यंतचा भारत-ब्रिटन रोडमॅप निश्चित करण्यात आला असल्याचे जॉन्सन म्हणाले. मे महिन्यात झालेल्या एका व्हर्च्युअल शिखर परिषदेत जॉन्सन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मजबूत ब्रिटन-भारत सामरिक संबंधांसाठी 2030 रोडमॅपवर स्वाक्षरी करण्यात आली होती.
नवोन्मेषाची आमची संस्कृती आणि उद्योजकतेच्या भावनेसह ब्रिटन आणि भारत हे स्वाभाविक भागीदार आहेत. एकत्र काम करत आम्ही लोकंच्या जीवनात बदल घडवून आणण्यास यशस्वी ठरू तसेच स्वातंत्र्य, मुक्तपणा आणि शांततेच्या सिद्धांतांच्या आधारावर एक नव्या तंत्रज्ञानाला आकार देण्यास मदत करू असे ब्रिटनचे पंतप्रधान म्हणाले.









