ऑनलाईन टीम / ब्रासिलीया :
भारत बायोटेकसोबतच्या लस खरेदी कराराचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहचल्याने ब्राझील सरकारने या कराराला स्थगिती दिली आहे. ब्राझीलचे आरोग्यमंत्री मार्सेलो यांनी याबाबतची घोषणाही केली.
ब्राझील सरकारने भारतील भारत बायोटेकशी 32 कोटी डॉलर्सचा ‘कोवॅक्सिन’ लस खरेदी करार केला होता. मात्र, हा करार वादाच्या भोवऱ्यात सापडला. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेइर बोल्सोनारो आणि ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांवर या करारावरुन गंभीर आरोप झाले होते. हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर ब्राझील सरकारने ‘कोवॅक्सिन’ लस खरेदी कराराला स्थगिती दिली.
दरम्यान, या स्थगितीनंतर भारत बायोटेकने एक निवेदन प्रसिद्ध करुन यासंदर्भात खुलासा केला आहे. ब्राझीलसोबतचा लस खरेदी करार 8 महिने चालला. 4 जून 2021 ला लसीच्या वापरास आपत्कालीन परवानगी मिळाली. 29 जूनपर्यंत त्यांना लसीचा पुरवठा करण्यात आला नसून, ब्राझीलकडून कोणत्याही प्रकारची आगाऊ रक्कम मिळालेली नाही.









