अध्याय तेरावा
भगवंत म्हणाले, मायेच्या नादाला लागल्यामुळे जीवाला मी कर्ता आहे असा अहंकार वाटू लागतो. अहंकारवीरहीत होण्यासाठी साधुसंतांची सेवा करावी. सद्गुरु हेच खरे साधु व सज्जन असतात, म्हणून त्यांच्या चरणांची सेवा करावी. सद्गुरूंचा उपदेश श्रुती वचनांना धरूनच असतो. त्या उपदेशाने ज्ञानरूपी खड्ग बुद्धीच्या हातात सापडते. ते शस्त्र वैराग्य आणि नैराश्यरूप सहाणेवर पाजळून लखलखीत करावे आणि बरोबर नेम साधून देहाभिमानाला छाटून टाकावे. अभिमानामुळे देहदुःख उत्पन्न होते, विषयांचाच छंद घडतो, काम व क्रोध ह्यांचे पोषण होते.
माया आणि अभिमान एकमेकांना पुष्ट करत असतात. म्हणून शूराने सद्गुरूंच्या कृपेने मिळवलेले ज्ञानरुपी धारदार शस्त्र घेऊन धैर्याने नीट उभे रहावे आणि अभिमानावर असा जोरदार घाव घालावा की, एकाच तडाक्मयात माया, ममता आणि अभिमान ह्या तिघांचेही एकदम तुकडे तुकडे व्हावेत. म्हणजे माझ्या पदाजवळ स्थान प्राप्त होते. जो सदोदित सावध राहून अनन्य भावाने माझे भजन करतो किंवा माझ्याच भावनेने जो सद्गुरूच्या पवित्र चरणांची सेवा करतो, त्याला ज्ञान प्राप्त होते. ज्ञानरूप खड्गाचे तेज पाहून काळाच्या हृदयात कापरे भरते, त्या शस्त्राच्या भीतीनेच माया, ममता व अभिमान ही जिवाला सोडून पूर्णपणे पळून जातात. भक्तिभावाने केलेल्या भजनात एव्हढे सामर्थ्य नक्कीच असते.
आता माझे भजन कोठे करावे याविषयी सांगतो ऐक. माझे स्वरूप अतक्मर्य, सूक्ष्म आणि निर्गुण असे आहे. जेथे मी पुरुषोत्तम राहत असतो, ते भजनस्थान केवळ निरुपम आहे. सर्व सुखे माझ्यात सामावलेली आहेत. मी प्रत्येकाच्या हृदयात सर्वदा समभावाने राहतो. त्या ठिकाणीच प्रेमाने मला भजावे. ब्रह्मदेवापासून तो माशीपर्यंत सर्वांच्या हृदयात एक मीच आहे. हे जो जाणतो तो भाग्यवान् होय आणि माझ्या प्राप्तीला माझे भजन हेच उत्तम साधन होय. माझ्या स्फुरणाने ज्ञान पायाजवळ येते पण दुःखाची गोष्ट अशी की, माझ्या ठिकाणी कोणीच भजनतत्पर न होता लोक अन्य उपाय करून व्यर्थ थकून जातात, अनेक प्रकारच्या संकटात पडतात. एखादा भाग्यवान त्याच्या हृदयात राहणाऱया माझा विचार करून निश्चयपूर्वक माझ्या भजनी लागतो. त्याने माझे भजन केले तर वैराग्ययुक्त आत्मज्ञान त्याला मिळते आणि त्याचे कधीही अधःपतन होत नाही. त्या ज्ञानाच्या भयानेंच अभिमान पळून जातो. सर्व आधिव्याधी नाहीशा होतात आणि सर्व संशयही पळून जातात, भक्त आत्मपदाला पोचतात. म्हणूनच बलवान् वीराने लखलखीत शस्त्राने संशय कडाकड छेदून टाकावा, असे मी मोठय़ा आग्रहाने सांगतो. पण माणसाला संसार तर अतिशय प्रिय असतो मग त्याला कोणत्या युक्तीने छेदावयाचे ? असे विचाराल तर सांगतो की, संसार म्हणून जितका आहे, तितकी सर्व भ्रांति आहे, हे जग, हा मनाचाच खेळ आहे, भास आहे, हे दिसणारे असल्यामुळे नाशवंत आहे या दृष्टीने याच्याकडे पाहावे. असे सांगण्याचे कारण म्हणजे त्रिगुणांमुळे एक परमात्माच जणू अनेक रूपांनी प्रकाशित झाल्यासारखा दिसतो पण ती त्याची माया असल्यामुळे स्वप्नाप्रमाणे खोटी आहे. देहापासून तो अहंकारापर्यंत जे पिंड-ब्रह्मांड भासते, तो सर्व मनाचाच विलास आहे.
संसार हा खरोखर मिथ्याच होय. ज्याप्रमाणे स्वप्नात मन हे सर्व त्रिभुवन पहाते, त्याप्रमाणेच अविद्या संसाररूपी लांबलचक स्वप्न उत्पन्न करते. त्यामुळे निरनिराळे आभास निर्माण होतात. जे एका स्वरूपाचे असून निराळय़ाच स्वरूपाचे दिसते त्याला आभास असे म्हणतात. पाण्यात ऊन पडल्यावर चमकणारा शिंपला चांदीचा आहे असा भास होतो, केवळ सूर्याचे किरण असतात त्या ठिकाणी मृगजळ पहातात, त्याप्रमाणे केवळ शुद्ध वस्तु जे परब्रह्म, त्यालाच भ्रमिष्ट लोक संसार असे म्हणतात. उदबत्ती गोल फिरविली म्हणजे अग्नीचे कडे झाल्यासारखे दिसते, त्यातील अग्नी हा सत्य असतो आणि त्याचेकडे हे मिथ्या असते. त्याप्रमाणे संसाराविषयीं विचार केला तर, ब्रह्म हे सत्य आणि संसार हा मिथ्या आहे.
क्रमशः








