अध्याय बाविसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा, विषयाची आसक्तीच परमार्थप्राप्तीला बाधक होते. ह्याकरिता खरोखर विषय सोडून दे आणि पुन्हा त्यांना हातही लावू नकोस. वृत्ती आसक्त झाली म्हणजे ती इंद्रियांना चिकटून बसते आणि तिला अत्यंत लुब्ध झाल्याने विषयाचे भोग भोगावेसे वाटतात. हाच संसाराचा मोठा रोग होय. त्यावर उद्धवाने शंका विचारली की, प्रारब्धानुसार भोग येत असतात, मग त्यांचा त्याग कसा घडेल? आणि विषयत्यागाचा उपाय सापडून वैराग्य कसे प्राप्त होईल? उत्तरादाखल भगवंत म्हणाले, उद्धवा, प्रारब्धानेच विषयभोग येतात आणि तेच साधकाला दुःख देतात. वणव्यात सापडलेली हरणे जशी होरपळतात, त्याप्रमाणेच साधकही दुःखात होरपळून निघतो. वाघाच्या तोंडात गाय सापडल्याप्रमाणे तो विषय भोगताना चरफडतो, कारण विषयभोगामुळे आपण कर्मबंधनात अडकू शकतो याची जाणीव त्याला असते. वारंवार वाटय़ाला आलेल्या विषयभोगातून त्याला विषयांचा अत्यंत तिटकारा येत असतो आणि या प्रखर जाणिवेतून झालेल्या अनुतापाने अनिवार वैराग्य उत्पन्न होते. असे खरे वैराग्य उत्पन्न झालेला शिष्य भेटला की, सद्गुरू म्हणतात आता हा कोरा आहे याला मी माझ्या मर्जीनुसार घडवू शकतो.
सद्गुरूंनी अशा पद्धतीने एकदा हाताशी धरले की, गुरुकृपा हाती लागते आणि गुरुकृपेच्या प्रभावानेच द्वंद्वासहवर्तमान सारा संसार नाहीसा होतो. गुरुकृपा साध्य झाली की, जिकडे तिकडे परब्रह्मच दिसू लागते. मग तेथे कर्म कशाचं आणि जन्ममरण तरी कशाचे? संसाराच्या भ्रमाचे सारे नावच नाहीसे होते. अगदी दिवा हातात घेऊन पाहिले तरी संसार म्हणून कसला तो दिसत नाही. ज्याप्रमाणे भ्रम नाहीसा झाल्यानंतर पाहू गेले असता दोरी सापासारखी दिसत नाही किंवा भिंगरी वेगाने गरगरा फिरत असली तरी ती सारखी उभीच आहे असे वाटते, त्याप्रमाणे भ्रमाचा बहर असतो. तोपर्यंत संसार हाच खरा असा भास होतो. किंवा असंही म्हणता येईल की, जो निखालस परिपूर्ण भ्रम असतो, त्याचंच नाव संसार. बाकी परब्रह्म पाहिले तर ते शुद्धच आहे. तेथे जन्मही नाही आणि कर्मही नाही. कुंभाराने मडके काढून नेले असताही त्याचे चाक जसे फिरतच असते, त्याप्रमाणे ब्रह्मज्ञान जरी प्राप्त झाले, तरी प्रारब्ध भोग हे भोगावेच लागतात. वृक्ष हा मुळासकट उपटून काढता येतो पण त्यातला ओलेपणा काही उपटून काढता येत नाही. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञान झाले तरी प्रारब्ध हे भोगावेच लागते. हे लक्षात घेऊन, प्रारब्धानुसार जर विषयभोग येऊन अंगावर पडले, तर त्याचा प्रतिकार करण्याच्या खटपटीत तो पडत नाही. शांतवृत्तीने तो ते सारे सहन करतो. जे विवेकसंपन्न व क्षमाशील साधु असतात, ते विषयभोग आले तरी अंगामध्ये परिपूर्ण शांती ठेवून आनंदाने वागत असतात.
शांतीच हातात आली, तर मग संसार तो बिचारा किती? शांतीने आपले कल्याण होते व जीवाला समाधान प्राप्त होते. दुर्जनांनी धक्के मारून बाहेर हाकलले, अपमान केला, उपहास केला, निंदा केली, मारपीट केली, बांधून ठेवले, उपजीविकेचे साधन काढून घेतले, अंगावर थुंकले किंवा निरनिराळय़ा प्रकारे त्रास देऊन चित्त विचलित करण्याचा प्रयत्न केला किंवा अशा तऱहेचे कोणतेही संकट असले, तरी ज्याला आपले कल्याण करून घेण्याची इच्छा आहे, त्याने आपल्या विवेकबुद्धीने त्या अडचणींपासून स्वतःचे रक्षण करावे. देहाभिमान बाळगणारे असे जे तामसी, अत्यंत दुष्ट व दुर्जन असतात, त्यांनी साधूंचा छळ केला, तरी त्या साधूंजवळ शांती असल्यामुळे ते कधीही क्रोधाच्या आधीन होत नाहीत. जे ज्ञानसंपन्न असतात, ते अल्पस्वल्प उपद्रवाने क्रोधाला येत नाहीत. किंवा त्यांचा अतिशय छळ केला, तरीही ते कोपायमान होत नाहीत. कायिक, वाचिक आणि मानसिक अशा तीन प्रकारच्या पीडा आहेत. परंतु साधु पुरुष आपल्या शांतवृत्तीतच अढळ असल्यामुळे ते सर्व विवेकाने सहन करतात. विवेक कसा म्हणशील तर समोर दिसणारे सर्व खोटेच आहे तर समोरच्या छळणाऱयाच्या अस्तित्वाला तरी काय अर्थ आहे असे तो समजतो.
क्रमशः








