प्रतिनिधी/ शिरोडा
बोरी येथील जुवारी नदीवरुन जलवाहिनी नेण्यासाठी उभारण्यात आलेल्या जुन्या लोखंडी पुलाचा काही भाग शनिवारी दुपारी नदीत कोसळून पडला. मडगाव व वास्को शहरात पाणी पुरवठा करणाऱया जलवाहिनीसाठी हा पूल बऱयाच वर्षांपूर्वी उभारण्यात आला होता. कालांतराने जलवाहिनीचा मार्ग बदलून ती नदीतून काढण्यात आल्याने काही वर्षांपासून या लोखंडी पुलावरील वाहिनी कायमची बंद करुन टाकण्यात आली होती. त्यानंतर हा लोखंडी पूल वापराविना गंजत पडला होता. शनिवारी सायंकाळी जोरदार पावसाच्यावेळी या लोखंडी पुलाचा साधारण आठ ते दहा मिटर्सचा भाग मोडून नदीत कोसळला. पुलाचा उर्वरीत भागही कमकुवत बनला असून कोसळण्याच्या स्थितीत आहे. हा लोखंडी पूल कोसळल्याची छायाचित्रे काही लोकांनी समाज माध्यमांवर टाकल्याने बोरी पुलाचा भाग कोसळल्याची अफवाही काहीवेळ पसरली होती.









