ऑनलाईन टीम / पुणे :
‘बोनस’ हा शब्द एक वेगळाच आनंद देऊन जातो. मग तो बोनस पैशांचा असो किंवा सुखाचा. बोनस मिळाला तर खुशी, नाही मिळाला तर नाराजी अशी ही मिक्स भावना प्रत्येकाची असते… आता फेब्रुवारी महिन्यात प्रेक्षकांना मराठी सिनेसृष्टीतला बोनस अनुभवयाला मिळणार आहे.
लायन क्राऊन एंटरटेनमेंट आणि जीसिम्स यांची प्रस्तुती असलेला, गोविंद उभे, एन. अनुपमा, कांचन पाटील निर्मित आणि युवा दिग्दर्शक सौरभ भावे दिग्दर्शित ‘बोनस’ हा मराठी सिनेमा येत्या 28 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अभिनेता गश्मीर महाजनी आणि अभिनेत्री पूजा सावंत या कलाकारांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने निर्माते गोविंद उभे यांच्याशी खास बातचीत करण्यात आली.
गोविंद उभे म्हणाले, प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी जर मी सिनेमाची निर्मिती करतोय तर त्यांचे निखळ मनोरंजन हे झालेच पाहिजे… ‘बोनस’ची कथा जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा मी ती ऐकली, समजून घेतली आणि मला ती आवडली देखील. या सिनेमाला होकार देताना हा सिनेमा प्रेक्षकांना नक्की आवडेल याची खात्री मला तेव्हा होती आणि अजूनही आहे. सिनेमाचा विषय चांगला आहे आणि कथेसह एक महत्त्वाचा संदेश यातून प्रेक्षकांना मिळेल.
या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत यांची ऑन स्क्रिन केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. तसेच दिग्दर्शन सौरभ भावे आणि छायाचित्रण संजय मेमाणे यांचे आहे… यांच्या विषयी सांगताना त्यांनी म्हटले की, माझ्या सिनेमाचा दिग्दर्शक सौरभ भावे हा उत्तम कथा आणि पटकथा लेखक आहे, या सिनेमाच्या निमित्ताने लिखाणासह त्याचे दिग्दर्शन कौशल्य देखील आता मराठी सिनेसृष्टीला पाहायला मिळेल. यंग दिग्दर्शक, यंग जोडी, यामुळे सिनेमात नाविन्य आणि एक वेगळी कथा पाहायला मिळेल. गश्मीर आणि पूजा हे दोघेही हुशार, समंजस आणि उत्तम कलाकार आहेत, नव्या जोडीची सुंदर केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.