अभिनेत्री प्रियांका चोप्राने अनेक वर्षांनी बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये नशीब आजमाविण्याच्या निर्णयाबद्दल मौन सोडले आहे. डेक्स शेफर्डचा पॉडकास्ट शो आर्मचेयर एक्सपर्टमध्ये प्रियांकाने यासंबंधी खुलासा केला आहे. प्रियांकाने बॉलिवूड सोडून देत गायन सुरू केले होते, त्यानंतर तिने अमेरिकेत जात हॉलिवूडमध्ये काम शोधण्यास सुरुवात केली होती.

बॉलिवूडमध्ये मनाजोगे काम मिळत नव्हते. तसेच बॉलिवूडमधील पॉलिटिक्समुळे मी त्रासून गेले होते. बॉलिवूडमध्ये मिळत असलेल्या कामाबद्दल आनंदी नव्हते, असे प्रियांकाने म्हटले आहे. प्रियांकाने 2012 मध्ये स्वतःच्या म्युझिक करियरची सुरुवात केली होती. तिचे पहिले गाणे ‘इन माय सिटी’ होते, याचबरोबर तिने ‘एक्झॉटिक’, ‘आय कान्ट मेक यू लव्ह मी’ यासारखी गाणी गायली होती. 2015 मध्ये तिने ‘मेरी कॉम’ या चित्रपटाकरता स्वतःचे पहिले हिंदी गीत गायिले होते. देसी हिट्सच्या अंजली आचार्य यांनी मला कुठल्यातरी म्युझिक व्हिडिओत पाहून फोन केला होता. अमेरिकेत म्युझिक करियर घडवू इच्छिणार का अशी विचारणा त्यांनी केली होती. त्यावेळी मी बॉलिवूडपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होते. बॉलिवूडमध्ये मला एकाकी पाडले जात होते. निर्माते-दिग्दर्शक मला संधी देण्यास टाळाटाळ करत होते. बॉलिवूडमधील पॉलिटिक्सचा त्रास होत असल्याने मला एका बेकची गरज होती असे प्रियांकाने म्हटले आहे. ‘क्वांटिको’ या वेबसीरिजद्वारे ती आता ग्लोबल स्टार ठरली आहे.









