ऑस्ट्रेलियन मीडियात व्हिडीओ व्हायरल, जडेजा बोटावर वेदनाशामक मलम लावत होता : भारतीय संघ व्यवस्थापन
वृत्तसंस्था/ नागपूर
भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने गुरुवारी ‘बॉल टॅम्परिंग’ केल्याचा संशय ऑस्ट्रेलियन मीडियाने व्यक्त केल्यानंतर भारतीय संघाने यासंदर्भात बाजू स्प्ष्ट केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 34 वर्षीय जडेजाने 5 बळी टिपले होते. त्यावेळी भेदक फिरकी मारा करत असताना त्याने चेंडूच्या बाबतीत काही तरी गडबड केल्याचा आरोप ऑस्ट्रेलियन मीडिया तसेच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने केला होता. भारतीय संघाने आता हा विषय सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्या नजरेस आणून दिलेला असून जडेजाने वेदनाशामक मलम वापरले होते, असा दावा त्यांनी केला आहे.
जडेजा चेंडू वळविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डाव्या हाताच्या तर्जनीला कसले तरी क्रीम चोळताना दिसणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वरील आरोप व वाद तयार झाला होता. ऑस्ट्रेलियन मीडियात हा व्हिडीओ भरपूर फिरलेला आहे. मात्र जडेजा आपल्या दुखऱ्या बोटावर मलम लावत होता, असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. गुरुवारी कसोटीच्या पहिल्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर सामनाधिकारी पायक्रॉफ्ट यांनी कर्णधार रोहित शर्मा व रवींद्र जडेजा यांच्या नजरेस हा मुद्दा आणून दिला. मिळालेल्या माहितीनुसार, सामनाधिकाऱ्यांनी त्यांना सदर व्हिडीओही दाखविला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या नियमांनुसार, जर सामनाधिकाऱ्यांना परिस्थिती खूप गंभीर वाटली, तर ते खासगी तपासाची विनंती करू शकतात. ऑस्ट्रेलिया 5 बाद 120 अशा स्थितीत असताना आणि अॅलेक्स कॅरी व पीटर हँड्सकॉम्ब हे फलंदाजी करत असताना ही घटना घडली. सदर व्हिडीओत जडेजा मोहम्मद सिराजच्या हाताच्या तळव्यावरून उजव्या हाताने काही तरी काढताना दिसतो. त्यानंतर चेंडू टाकण्यापूर्वी जडेजा डाव्या हाताच्या तर्जनीला काही तरी चोळताना दिसतो. त्यावेळी चेंडू हातात असला, तरी तो चेंडूला काहीही लावताना दिसलेला नाही. त्याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या संघाला याविषयी काहीच माहिती नव्हती आणि ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्धीमाध्यमांनी हा विषय उचलून धरल्याचे दिसून आले. मात्र पाहुण्या संघाने याविषयी तक्रार केलेली नाही.
या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने मलम चोळताना जडेजाने चेंडू पंचांकडे द्यायला हवा होता, असे म्हटले आहे, तर माजी कर्णधार टीम पेनने हा प्रसंग कुतूहल वाढविणारा असल्याचे म्हटले आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार वॉनने आपण असला प्रकार क्रिकेटच्या मैदानावर कधी पाहिलेला नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही जेव्हा पहिल्यांदा हा व्हिडीओ पाहिला तेव्हा ते चांगले वाटले नाही, असे ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक ब्रॅड हॅडिनने म्हटले आहे.

माजी फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉगकडून जडेजाचा बचाव
ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉगने मात्र जडेजाचा बचाव केला असून सर्व अफवा उडवून लावल्या आहेत. ‘जर तुम्ही बारकाईने पाहिले, तर सिराजच्या हातावरील क्रीम आहे हे टीव्हीवर स्पष्टपणे दिसते. जडेजाने ते आपल्या बोटावर लावले, कुठल्याच वेळी त्याने ते चेंडूवर लावलेले नाही. त्यामुळे आणखी चर्चा करण्याची गरजच नाही’, असे त्याने म्हटले आहे. पाकिस्तानचा माजी सलामीवीर सलमान बटनेही जडेजाचे समर्थन केले आहे. ‘ऑस्ट्रेलियन मीडियाने रवींद्र जडेजावर बॉल टॅम्परिंगचा आरोप केला आहे. मात्र एखाद्या फिरकी गोलंदाजाला तसे करून काय फायदा होईल? केवळ क्रिकेटविषयी अडाणी असलेले लोकच अशा प्रतिक्रिया देऊ शकतात’, असे बटने म्हटले आहे.









