सध्या जोसी नामक एका मुलीची चर्चा जगभर होत आहे. तिचं वजन 137 किलो होतं. त्यामुळं तिच्या बॉयप्रेंडनं तिला सोडलं. मग तिनं वजन कमी करणं मनावर घेतलं आणि दोन वर्षात तब्बल 63 किलो वजन कमी करून ती तुलनेनं स्लीम मुलगी बनली.
22 वषीय या तरुणीनं एका मुलाखतीत आपली वजन कमी करण्यामागची कहाणी आणि त्यामागचं कारणही सांगितलं आहे. वयाच्या 15-16 व्या वषी ती फारशी जाड नव्हती. तथापि, 18 व्या वर्षानंतर अचानक वजन वाढायलं लागलं. पाहता पाहता ते नियंत्रणाबाहेर गेलं आणि तिचे मित्रमैत्रिणी तिची खिल्ली उडवू लागले. विशेषतः तिच्या अत्यंत जवळच्या मित्रानं तिच्याशी संबंधच तोडले. हा घाव तिला खोलवर लागला. आणि तिनं वजन कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले. दररोज भरपूर व्यायाम करणं, आवडतं खाणं घेण्यापेक्षा प्रकृतीला योग्य असं खाणं घेणं, सोनाबाथ, पोहणं इत्यादी उपक्रम तिने मनापासून सुरू केले. याचा परिणाम हळूहळू दिसू लागला. पहिल्या सहा महिन्यात दहा किलो वजन कमी केल्यानं तिचा आत्मविश्वास दुणावला. अशा तऱहेनं दोन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर तिनं 140 पौंड अर्थात 63 किलो वजन घटवलं आहे. आता ती 74 किलोची आहे. हे वजनही तिच्या उंचीच्या मानानं थोडं जास्तच. मात्र, तिच्या दिसण्यात खूप फरक पडला आहे. त्यामुळं आता तिची चर्चा होऊ लागली आहे. तिनं गमावलेलं मित्र पुन्हा तिच्याजवळ येऊ लागलेत. इतकंच नव्हे तर तिच्या निर्धारामुळं ती कौतुकाचा विषय बनली आहे.
अर्थात अवघ्या दोन वर्षात इतकं वजन कमी केल्यानं तिला थोडाफार अशक्तपणा जाणवतो. पण ती त्याकडे लक्ष देत नाही. आता तिनं वजन नियंत्रणात ठेवणारे पण शक्ती वाढविणारे पदार्थ घेण्यास सुरुवात केली आहे. चवीवर भर देण्यापेक्षा आहारातील पोषक द्रव्यांकडे ती अधिक गांभीर्यानं पाहते. त्यामुळे प्रोटिनयुक्त पदार्थ, फळं, उकडलेल्या भाज्या अशा तऱहेचे डाएट ती पसंत करते. परिश्रमपूर्वक कमी केलेलं वजन याच पातळीवर राखणं हे तिच्या समोरील सर्वात महत्त्वाचं आव्हान आहे. मात्र, या अग्निपरीक्षेतही आपण उत्तीर्ण होऊ, असा तिला विश्वास वाटतो.









