ऑनलाईन टीम / मुंबई :
बेस्टच्या प्रदूषणविरहीत 26 इलेक्ट्रिक बस आजपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या इलेक्ट्रिक बसेसचे लोकर्पण मुंबईतल्या नरीमन पाँईट इथे झाले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

एका तासात ही बस संपूर्ण चार्ज होते. या बसचा वेग 75 किलोमीटर प्रतिसास आहे. एकदा चार्ज केल्यावर ही बस 140 ते 150 किमी अंतर कापते. या बसमध्ये 28 प्रवासी आसन व्यवस्था आहे. बेस्टकडं सध्या 46 इलेक्ट्रिक बसेसचा ताफा असून त्यात आता 26 आणखी बसेसची भर पडली आहे.
यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, 2013 मध्ये 6 इलेक्ट्रिक बसेस, 2014 मध्ये 40 आणि आता 340, हीच आमची इलेक्ट्रिक पब्लिक मोबिलिटीबद्दल वचनबद्धता. तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि सध्याचे अनिल परब यांच्यासोबत आणि माझ्या समन्वयानुसार MSRTCच्या मार्गांवर इलेक्ट्रिक बस आणून संपूर्णपणे इलेक्ट्रिक होणे हा मानस आहे.
तत्कालीन महापालिका आयुक्त अजोय मेहता तसेच तत्कालीन केंद्रीय मंत्री अनंत गिते आणि नंतर अरविंद सावंत यांच्यासोबत आम्ही केलेल्या बैठका मला आजही आठवतात. म्हणूनच या 340 बसेससाठी मी या सर्वांचा आभारी आहे, आदित्य ठाकरे म्हणाले.
दरम्यान, या लोकार्पण सोहळ्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी बसची पाहणी केली. एसी बस जनतेसाठी सोयीची आणि सुखकारक ठरेल याची खात्री करण्यासाठी स्वत: या नवीन इलेक्ट्रीक बसमध्ये प्रवास केला.
तसेच या बसेसमध्ये सुरक्षेची काळजी घेण्यात आली असून अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसविण्यात आले आहे. या कॅमेऱ्याद्वारे बसेसमध्ये होणाऱ्या अनुचित घटनांवर देखरेख ठेवली जाणार आहे. विशेषत: महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे सीसीटीव्ही कॅमेरे महत्वाचे ठरणार आहेत.
- बसमध्ये इलेक्ट्रीक लिफ्टची सुविधा
अपंग प्रवाशांना चढण्या-उतरण्यात समस्या येऊ नये यादृष्टीने बस गाड्यांमध्ये इलेक्ट्रीक लिफ्टची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही सुविधा अपंग प्रवाशांसाठी सोयीची ठरणार आहे.








