महापौर रोहित मोन्सेरात यांचा इशारा
प्रतिनिधी / पणजी
मार्केट संकुलात शिस्त यावी तसेच समस्येचे निराकरण व्हावे यासाठी पणजी महापौर रोहित मोन्सेरात, उपमहापौर वसंत आगशीकर, मनपा आयुक्त संजित रॉड्रीग्स, मनपा बाजार समितीचे प्रमेय माईणकर, व इतर पदाधिकाऱयांसोबत पणजी बाजारसंकुलात जाऊन पाहणी केली. ज्या व्यापाऱयांना सुविधा नाहीत त्यांना सुविधा पुरविण्याबाबत तसेच अतिक्रमणावर कारवाई आणि बेशिस्तपणाने वागणाऱयांवर लगाम आणण्याचा ध्यास महापौरांनी घेतला आहे.
बाजारात संकुलात पाहणी केल्यानंतर मोठय़ा प्रमाणात व्यापाऱयांनी अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणावर मनपाने कारवाई करूनही व्यापाऱयांकडून अतिक्रमण होत आहे. यावर लवकरच कडक कारवाई होईल. याशिवाय मनपा कर्मचारी वेळेत कामावर येत नसल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. गैरहजेरी दिसून आली तर पगार कापला जाईल. बेशिस्तपणा कधीच खपवून घेतला जाणार नाही असा इशारा महापौर रोहित मोन्सेरात यांनी यावेळी दिला.
अंडरग्राऊंड पार्किंग, व इतर समस्यांवर लवकरच तोडगा काढण्यात येईल. हे सर्व काही एका दिवसात होऊ शकत नाही. काही वेळ जाणार. परंतु मार्केटमध्ये शिस्त आणि स्वच्छता आणण्याचा प्रयत्न सर्वतोपरी करण्यात येणार असल्याचे मोन्सेरात यांनी यावेळी सांगितले.









