ऑनलाईन टीम / औरंगाबाद :
औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात पडून असलेल्या एका वृद्ध महिलेच्या पार्थिवावर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी अंत्यसंस्कार केले. दानवे यांनीच या वृद्धेला अग्नी दिला.
लताबाई असे या वृद्धेचे नाव होते. गुलमंडीतील सुपारी हनुमान मंदिराजवळ भीक मागून त्या आपला उदरनिर्वाह करत होत्या. मागील ३५ वर्षांपासून त्या इथे होत्या. त्यांना आठवडाभरापूर्वी ह्रदयविकाराचा झटका आला. शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी लताबाईंना घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, दोन दिवसातच त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.
घाटी रुग्णालयाने त्यांच्या कुटुंबियांची 24 तास वाट पाहून मृतदेह बेवारस घोषित केला. शिवसैनिकांनी नियमांची पूर्तता करत लताबाई यांचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर कैलासनगर स्मशानभूमीत शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी वृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार करत तिला अग्नी दिला.









