वार्ताहर / किणये
बेळगुंदी भागात अपुरी व अनियमित बससेवा असल्यामुळे विद्यार्थी व प्रवासीवर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. बस केव्हा येते व केव्हा जाते, हेच कळत नसल्यामुळे तासन् तास बसथांब्यावर ताटकळत बसण्याची वेळ प्रवासीवर्गावर आली आहे. यामुळे बेळगुंदी भागातील बससेवा सुरळीत करण्याची मागणी आत्मनिर्भर भारत बेळगाव ग्रामीणच्या महिलांनी केली आहे.
मंगळवारी कर्नाटक वायव्य परिवहन मंडळाचे विभागीय नियंत्रक एम. आर. मुंजी यांना निवेदन देऊन बेळगुंदी परिसरातील बससेवेबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच सुरळीत बससेवा नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तेव्हा या भागात बससेवा नियमित ठेवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. बेळगुंदी भागातील बरेच विद्यार्थी शाळा-कॉलेजसाठी बेळगावला येतात. मात्र, सकाळच्या वेळेत त्यांना बस उपलब्ध होत नाही. यामुळे त्यांना शाळेला वेळेवर जाणे अवघड होऊ लागले आहे. तसेच दुपारी काही विद्यार्थी शाळा-कॉलेज करून घरी परततात. दुपारी दीडच्या वेळेत बससेवा सुरू करण्यात यावी व सकाळी साडेसातच्या दरम्यान बससेवा सुरू करावी, असेही या निवेदनात म्हटले आहे. पश्चिम भागातील बेळगुंदी, सोनोली, बेळवट्टी, इनाम बडस या गावांमध्ये बससेवेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे सर्वांचीच गैरसोय होते. या भागातील शेतकऱयांची रोज बेळगावला काही खरेदी तसेच सरकारी कार्यालयाकडे ये-जा असते. मात्र, वेळेवर बस मिळत नसल्यामुळे त्यांचा दिवस प्रवासासाठी खर्ची पडू लागला आहे.
यामुळे या परिसरात नियमित बससेवा सुरू करण्याची मागणी शेतकरी वर्गातूनही होत आहे.
मंगळवारी वायव्य परिवहन मंडळाला आत्मनिर्भर भारत बेळगाव ग्रामीणच्या अध्यक्षा शारदा आमरोळकर, ज्योती बोकमूरकर, नथाली बडसकर, प्रभावती खन्नूरकर, एन. के. सुतार आदी महिलांनी निवेदन दिले आहे.