कर्नाटकची बस चंदगड-आजरा भागात सुरू
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना आणि कर्मचाऱयांच्या संपामुळे मागील काही महिन्यांपासून ठप्प झालेल्या लालपरीने शुक्रवारी बेळगावात एन्ट्री केली. आजरा आगारातील आजरा-बेळगाव बस बेळगावात दाखल झाली. याचबरोबर कोकणातून कणकवली बसदेखील बेळगावात दाखल झाली. त्यामुळे प्रवासीवर्गांतून समाधान व्यक्त होत आहे. याचबरोबर बेळगाव बसस्थानकातूनही चंदगड, आजरा बससेवा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना व विद्यार्थ्यांना सोयिस्कर झाले आहे.
मागील दोन वर्षांत कोरोनामुळे बससेवेवर मोठा परिणाम झाला आहे. विशेषतः आंतरराज्य बससेवा कोलमडली होती. त्यामुळे सीमाहद्दीवरील प्रवाशांचे हाल झाले. दरम्यान, चेकपोस्ट नाक्मयावर आरटीपीसीआर व कोरोना चाचणी बंधनकारक केली होती. त्यामुळे प्रवाशांना कर्नाटक-महाराष्ट्र असा प्रवास करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. मात्र आरटीपीसीआर सक्ती मागे घेण्याबरोबर दोन्ही राज्यांची बससेवा हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने प्रवाशांचा प्रवास सोयिस्कर होताना दिसत आहे.
महाराष्ट्राची लालपरी यापूर्वी निपाणी, संकेश्वर, हुक्केरी भागात धावत होती. मात्र बेळगावात एन्ट्री झाली नव्हती. अखेर शुक्रवारी आजरा आगारातील लालपरीने बेळगावात एन्ट्री केली. त्यामुळे आजरा परिसरातील नेसरी, कोवाड, भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आता कर्नाटक पाठोपाठ महाराष्ट्रानेदेखील कर्नाटकात बससेवा सुरू केली आहे. त्यामुळे सीमाहद्दीवरील प्रवासी आणि विद्यार्थ्यांची सुविधा झाली आहे.
प्रवाशांच्या संख्येनुसार फेऱया वाढविणार
चंदगड, आजरा भागात बससेवा सुरू केली आहे. त्याबरोबर कोकणातही बस धावत आहेत. प्रवाशांच्या संख्येनुसार बसफेऱया वाढविल्या जाणार आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात बस धावत आहेत.
-के. के. लमाणी (विभागीय संचार अधिकारी)









