बेळगाव:
बेळगाव जिल्हय़ात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने ऍक्शन प्लॅन तयार केला आहे. जिल्हाधिकारी व त्यांचे सहकारी योग्य ती खबरदारी घेत आहेत. नागरिकांनी लक्षणे आढळल्यास त्वरित सरकारी रुग्णालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांनी केले.
सोमवारी सकाळी मंत्री अंगडी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारकडून करण्यात येत असलेल्या कोरोनाविरुद्धच्या नियोजनाविषयी माहिती दिली. कोरोना ही देशावर आलेली आपत्ती आहे. त्यामुळे जाती-धर्माचे कोणतेही राजकारण न करता, भारतीय म्हणून प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडायची आहे. मुस्लीम समाजातील नागरिकांशी रविवारी संवाद साधला असून धार्मिक सण घरीच साजरे करण्याचे आवाहन त्यांनी केले.
बेंगळूरच्या घटनेची सखोल चौकशी होणार
बेंगळूरच्या पदरायानापूर येथे झालेल्या प्रकाराची राज्याच्या गृह विभागाकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. राज्यात अशाप्रकारे कोणतेही प्रकार घडणार नाहीत, याची खबरदारी घेऊन दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. काही व्यक्ती अफवा पसरवून सामाजिक वातावरण बिघडविण्याचे प्रयत्न करीत आहेत. सध्या कोरोनाचे संकट महाभयंकर असून अशा प्रकारांना थारा देऊ नये, असे सुरेश अंगडी यांनी सांगितले.









