आरडीज फुटबॉल अकादमीचा अभिनव उपक्रम
बेळगाव : क्रिकेट व हॉकीप्रमाणेच बेळगावला फुटबॉलची देखील वैभवशाली परंपरा आहे आणि हीच परंपरा जोमाने पुढे नेण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या आरडीज फुटबॉल अकादमीने आणखी एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे. टिळकवाडीतील राहुल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखालील या फुटबॉल अकादमीच्या युवा खेळाडूंना सध्या नायजेरियन प्रशिक्षकाकडून मार्गदर्शन लाभत आहे आणि ते नायजेरियन प्रशिक्षक आहेत व्हॅलेन्टिन इझुगो.
व्हॅलेन्टिन इझुगो आशियाई फुटबॉल कॉन्फडरेशन सी परवानाप्राप्त प्रशिक्षक असून नव्वदीच्या दशकापासून गोव्यात विविध स्तरावर कार्यरत राहिले आहेत. त्यांनी आयलीग स्पर्धेत सातत्याने सहभाग घेतला आहे. तसेच, प्रारंभीच्या टप्प्यात साळगावकर संघाकडून खेळणारे ते पहिले नायजेरियन खेळाडू देखील ठरले आहेत.
व्हॅलेन्टिन यांच्या या अनुभवाचा लाभ बेळगावातील युवा फुटबॉलपटूंना व्हावा, या उद्देशाने राहुल देशपांडे यांनी त्यांना बेळगावात पाचारण केले. व्हॅलेन्टिन यांनी यापूर्वी बेळगावात प्रशाला स्तरावरही प्रशिक्षण दिले. मात्र, एखाद्या क्लब संघाशी करारबद्ध होत अकादमीतील युवा खेळाडूंना प्रशिक्षण देण्याची ही त्यांची पहिली वेळ आहे.
शिस्त हा पहिला संस्कार
या अभिनव उपक्रमाबद्दल बोलताना राहुल देशपांडे म्हणाले, ‘खेळाडूंच्या अंगी शिस्त बाणवणे, हा कोणत्याही प्रशिक्षणामागील पहिला संस्कार असतो आणि आमच्या अकादमीत आम्ही याला प्रथम प्राधान्य देत आलो आहोत. प्रत्येक खेळाडूची मजबुती, कमकुवत दुवे, चेंडूवरील नियंत्रण, ड्रिबलिंग-पासिंगवरील हुकूमत यावर आम्ही विशेष मेहनत घेतो आणि या साऱया वाटचालीत क्लब स्तरावर अनेक उपक्रम राबवण्यावर आम्ही भर देत आलो आहोत. फुटबॉल हा केवळ क्रीडा प्रकार नाही तर त्याचे स्वतंत्र मानसशास्त्रही आहे. त्यामुळे, खेळाडूंना विविध परिस्थितीवर मार्ग काढण्याचे धडे आम्ही देतो. व्हॅलेन्टिन यांच्या निमित्ताने विदेशी प्रशिक्षक नवनव्या तंत्राचे धडे देत असल्याने पालकांकडून देखील यांचे उत्स्फूर्त स्वागत झाले, ही आम्ही आमच्या या उपक्रमाची पोचपावती मानतो’.









