अतिरिक्त न्यायाधीश म्हणून के. एस. हेमलेखा शपथबद्ध
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशपदी बेळगाव येथील के. एस. हेमलेखा यांची नियुक्ती झाली असून त्यांनी न्यायाधीशपदाची शपथ नुकतीच घेतली. बेळगावच्या या कन्येने घेतलेल्या गरुडझेपेमुळे बेळगावचे नाव उज्ज्वल झाले आहे.
हेमलेखा या लहानपणापासूनच हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखल्या जात होत्या. भारतीय नृत्य कलेमध्ये त्यांनी अनेक पारितोषिके मिळविली आहेत. सहा वर्षांच्या असतानापासूनच त्यांनी पारितोषिके मिळविली आहेत. डी. पी. स्कूलमध्ये त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. 1990 मध्ये त्या दहावी उत्तीर्ण झाल्या. गोगटे महाविद्यालयामधून 1996 साली कॉमर्सची पदवी घेतली. राजा लखमगौडा लॉ कॉलेजमधून 1999 मध्ये त्यांनी एलएलबीची पदवी मिळविली.
31 जुलै 1999 पासून त्यांनी वकिली पेशाला सुरुवात केली. 1999 ते 2000 पर्यंत ज्येष्ट वकील अशोक पोतदार यांच्याकडे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर 2000 ते 2008 पर्यंत जी.बाळकृष्ण शास्त्राr, बेंगळूर यांच्याकडे ज्युनिअर म्हणून काम केले. त्यांनी 2008 पासून धारवाड उच्च न्यायालयामध्ये स्वतःच वकिली सुरू केली. त्यांनी दिवाणी, प्रशासकीय लवाद, जिल्हा न्यायालय या ठिकाणी काम केले. केंद्र सरकारने स्टँडींग कौन्सिलपदी त्यांची नियुक्ती केली. त्यांनी उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशपदाची शपथ घेतली. त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.









