प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावमध्ये सर्व सोयीनियुक्त विभागीय ई-असेसमेंट कार्यालय सुरू करण्याबाबत बेळगावच्या चार्टर्ड अकौंटंट्सच्या संघटनेने आयकर खात्याचे मुख्य आयुक्त व प्रधान आयुक्त यांची गोवा येथे भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आहे. संघटनेने कर्नाटक आणि गोव्याचे आयकर आयुक्त बी. व्ही. गोपीनाथ व प्रधान आयुक्त आम्रपालीदास यांची गोवा येथे भेट घेऊन त्यांनाही निवेदन सादर केले.
संघटनेचे शाखाध्यक्ष सतीश मेहता यांच्यासह अन्य सदस्यांनी बेळगावच्या वित्तीय व्यवहाराबद्दल आयुक्तांना माहिती दिली. विभागीय ई कार्यालय सुरू करण्यासाठी गणेशपूर येथे 4.5 एकर जागा मिळाली आहे. त्याचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. मात्र 2019 मध्ये बेळगावमधील मुख्य प्रधान आयकर कार्यालय बंद करण्यात आले. ते पूर्ववत सुरू करावे, त्याशिवाय प्राप्तिकर न्याय प्राधिकरणाचे (लवाद) कार्यालय सुरू करावे, अशी मागणी केली आहे. सदर कार्यालये सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान 16 निकषांची माहिती त्यांनी अधिकाऱयांना दिली.
संघटनेने दिलेल्या निवेदनाचा स्वीकार करून अधिकाऱयांनी आयकर कार्यालय बंद करण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. बेळगाव ही राज्याची दुसरी राजधानी समजली जाते. शिवाय सर्वाधिक कर देणारे हे शहर आहे. अशावेळी येथे फक्त एका आयकर अधिकाऱयाची नेमणूक करून कार्यालय स्थलांतर केल्याबाबत नापसंती व्यक्त केली व सदर कार्यालयाची आवश्यकता जाणून घेऊन त्याबाबत विचारविनिमय करून कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
बेळगावमधून आयकर व्यवस्थित व अधिक पटीने भरला जात असून, बेळगावकरांना अत्याधुनिक अशा आयकर कार्यालयाची आवश्यकता आहे. येथे हवाई वाहतूक, रेल वाहतूक सुविधा असून शैक्षणिक व वैद्यकीय सुविधाही उपलब्ध आहेत. त्यामुळे बेळगावकरांना आयकर कार्यालयाची सुविधा देणे आवश्यक आहे, असेही अधिकाऱयांनी स्पष्ट केले.
यावेळी सतीश मेहता यांच्यासह सचिव प्रकाश तिगडी, संघटनेचे अध्यक्ष बी. बी. चंदरगी, नितीन निंबाळकर, सचिन खडबडी यांनी हे निवेदन दिले.









