ट्रू जेटची मंगळवारची सर्व सेवा ठप्प
प्रतिनिधी/ बेळगाव
दिवाळीची सुटी संपवून पुन्हा आपल्या कामावर रुजू होण्यासाठी काहांनी विमान प्रवासाचा पर्याय निवडला. सोमवारी संध्याकाळी 7 वा. बेळगाव विमानतळावरून म्हैसूरकरिता विमानाने उड्डाणदेखील केले. पण सदर विमान म्हैसूरऐवजी चेन्नईला जाऊन उतरले. विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पायलटने घेतलेल्या निर्णयामुळे विमान प्रवाशांना फटका बसला.
कुटुंबीयांसमवेत दिवाळी साजरी करण्यासाठी अनेकजण गावी परतले होते. चार दिवस दिवाळीची सुटी पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी कामावर रुजू होण्यासाठी सोमवारी रात्री विमान प्रवासाचा पर्याय निवडला. ट्रू जेट कंपनीचे विमान रात्री 7 वा. बेळगाव विमानतळावरून निघाले. परंतु ते म्हैसूरला पोहोचलेच नाही. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते थेट चेन्नईला नेण्यात आले.
बिघाड झाल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. विमान रात्री 9 वा. चेन्नई विमानतळावर पोहोचले. त्यानंतर निश्चित स्थळी पोहोचण्याऐवजी दुसऱया ठिकाणी पोहोचल्याने प्रवाशांचे नियोजन कोलमडले. पर्याय शोधण्यासाठी धावपळ करावी लागली. रात्रीच्या वेळी पोहोचल्याने पुन्हा म्हैसूरला कसे पोहोचायचे यासाठी प्रवासी साधनांचा शोध घेण्याची वेळ प्रवाशांवर आली. म्हैसूर ते चेन्नई हे अंतर 481 कि. मी. असल्याने या प्रवासासाठी विविध पर्यायांचा अवलंब करावा लागला. पण यामुळे वेळ आणि आर्थिक ठपकाही बसला. ज्यांना मंगळवारी कामावर रुजू व्हायचे होते त्यांना या सर्वाचा फटका बसला. त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात होता.
मंगळवारची ट्रू जेट सेवा रद्द
ट्रू जेट कंपनीकडून दररोज बेळगावमधून म्हैसूर, कडप्पा, हैद्राबाद व तिरुपती या शहरांना विमानांची ये-जा असते. परंतु सोमवारी रात्री विमानात झालेल्या बिघाडानंतर ट्रू जेटने मंगळवारची बेळगाव विमानतळावरून होणारी सर्व उड्डाणे रद्द केली. अचानक विमान रद्द झाल्यामुळे प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागला. इतर वाहनांच्या साहाय्याने प्रवास करण्याची वेळ त्यांच्यावर आली.
राजेशकुमार मौर्य (संचालक, बेळगाव विमानतळ)
तांत्रिक बिघाडामुळे म्हैसूरला उतरणारे विमान नाईलाजास्तव चेन्नईला घेऊन जावे लागले. विमानातील सर्व प्रवासी सुखरुप असून, ट्रू जेटने मंगळवारची सर्व विमानोड्डाणे रद्द केल्याची माहिती त्यांनी दिली.









