व्यापाऱयांमधून होतेय मागणी, व्यवसाय वाढीसाठी होईल फायदा
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावमधून धावणाऱया बऱयाचशा रेल्वे या मिरजपर्यंत धावतात. परंतु मिरजपासून काहीच अंतरावर असणाऱया सांगली शहराला रेल्वे उपलब्ध नसल्याने बेळगावच्या व्यापाऱयाला खीळ बसत आहे. प्रवाशांना बेळगाव सांगली असा थेट प्रवास करता येत नसल्यामुळे बेळगाववरून धावणाऱया एक्स्प्रेस सांगलीपर्यंत वाढवाव्यात, अशी मागणी बेळगाव, हुबळी-धारवाड येथील व्यापाऱयांमधून रेल्वेकडे करण्यात आली आहे.
सांगली हे शहर जगातील सर्वात मोठे हळदीचे मार्केट म्हणून ओळखले जाते. बेळगाव जिल्हय़ातील दररोज अंदाजे 6 हजार नागरिक सांगली जिल्हय़ात केवळ हळद व त्यावर पुरक व्यवसायासाठी ये-जा करतात. तर इतर व्यवसाय व नोकरीसाठी 3 हजार नागरिक ये-जा करतात. सध्या या मार्गावर पाच एक्स्प्रेस रेल्वे धावत आहेत. यातील 3 सकाळच्या सत्रात आहेत. या एक्स्प्रेस रेल्वे सांगली, मिरज, घटप्रभा, बेळगाव या मुख्य रेल्वे स्थानकांवर थांबतात. परंतु जिल्हय़ातील गोकाक, चिकोडी रोड, उगार, शेडबाळ, रायबाग, कुडची यासारख्या लहान रेल्वे स्थानकांमधून सांगलीला थेट रेल्वे उपलब्ध नसल्याने त्याचा परिणाम व्यापारावर होत आहे. सांगली ते बेळगाव अशी थेट पॅसेंजर रेल्वे नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. मिरज रेल्वे स्थानकात उतरून प्रवाशांना रिक्षाने सांगली शहर गाठावे लागत असल्याचे पश्चिम महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघाचे संचालक उमेश झा यांनी सांगितले. मिरज शहराला जाणारे जास्तीत जास्त प्रवासी हे रेल्वेनेच जातात, परंतु अद्यापही मिरज ते बेळगाव या दरम्यान पॅसेंजर रेल्वे सुरू करण्यात आलेले नाही. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने तांत्रिक कारणाने रेल्वे सुरू केली जात नसल्याचे कारण दिले असले तरी हे पूर्णपणे चुकीचे आहे. कोरोनापूर्वी बेळगाव ते मिरज या दरम्यान 6 पॅसेंजर रेल्वे धावत होत्या. सध्या मात्र बेळगाव ते शेडबाळ या दरम्यान एकच पॅसेंजर धावत आहे. केवळ बेळगावच नाहीतर सांगली येथील हळद मार्केटलाही कोरोनाचा जोरदार फटका बसला आहे. त्यामुळे सांगली ते बेळगाव दरम्यान पॅसेंजर रेल्वे सुरू करण्यासाठी सांगली येथील चेंबर ऑफ कॉमर्सने बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांना पत्र पाठवून रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.









