खानापूर तालुक्यातील शेतकरी अद्याप नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत : शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /खानापूर
बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गात भूसंपादित झालेल्या शेतकऱयांच्या नुकसानभरपाईचे दावे लवकरात लवकर निकालात काढून त्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मंजूर करा, अशा मागणीचे निवेदन महामार्गात जमीन संपादित झालेल्या शेतकऱयांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांना सादर केले आहे.
या शिष्टमंडळाचे नेतृत्व बेळगाव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी केले. या शिष्टमंडळात खानापूर तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल, गुंडू तोपिनकट्टी, प्रवीण पाटील, रवि गुरव, दत्ता गुरव व इतर शेतकऱयांचा समावेश होता.
बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गासाठी खानापूर तालुक्यातील इदलहोंड, निट्ठूर, हलकर्णी, करंबळ, शिंदोळी, गुंजी, लोंढा, मोहीशेत यासह जवळपास दहा ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील शेतकऱयांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. यापैकी बऱयाच शेतकऱयांना एक पैसाही नुकसानभरपाई मिळालेली नाही. तर जवळपास 207 शेतकऱयांनी प्राथमिक नुकसानभरपाई स्वीकारून अधिक नुकसानभरपाईसाठी जिल्हाधिकाऱयांच्या न्यायालयात दावे दाखल केले आहेत. यापूर्वी उपविभाग अधिकाऱयांकडे जवळपास 9 महामार्गातील जमीन संपादित झालेल्या शेतकऱयांनी दावे दाखल केले होते. पण बेळगाव-पणजी महामार्गातील शेतकऱयांचे दावे लवकरात लवकर न्याय मिळण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी बेळगाव यांच्या न्यायालयात वर्ग करावे, अशी मागणी खासदार अनंतकुमार हेगडे तसेच तत्कालीन विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती.
ही मागणी पूर्ण करण्यासाठी उभय नेत्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. याकामी जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनीदेखील त्या दोन्ही नेत्यांना वरचेवर भेटून न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. राज्य शासनानेही केलेल्या शिफारसीनुसार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने बेळगाव-पणजी महामार्गातील भूसंपादन झालेल्या शेतकऱयांच्या नुकसानभरपाईचे दावे जिल्हाधिकारी बेळगाव यांच्याकडे वर्ग करण्यास मंजुरी दिली. आता जवळपास 207 दावे जिल्हाधिकारी न्यायालयात वर्ग झाले आहेत. त्या दाव्यांचा लवकरात लवकर निकाल लावावा व शेतकऱयांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱयांच्याकडे केली. तसेच याआधी करंबळमधील एका शेतकऱयाला प्रति गुंठय़ाला 7 लाख 20 हजार रु. इतकी नुकसानभरपाई दिली आहे. तर त्या जमिनीच्या बाजूला असलेल्या इतर जमिनीला प्रति गुंठय़ाला केवळ 5 हजार इतकीच नुकसानभरपाई दिली आहे. असा भेदभाव केला जाऊ नये, तसेच गुंठय़ाला कमीतकमी 12 लाख रु. इतकी नुकसानभरपाई द्यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी आपण शेतकऱयांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.
खानापूर तालुक्यात जमीन संपादित झालेल्या बऱयाच शेतकऱयांनी अद्याप नुकसानभरपाईसाठी दावेच दाखल केलेले नाहीत. त्यामध्ये गणेबैल, अंकले, हत्तरगुंजी येथील शेतकऱयांना तर गुंठय़ाला 1200 ते 1500 रुपये इतकी अत्यल्प नुकसानभरपाई मंजूर केली आहे. यामुळे या तिन्ही गावातील बऱयाच शेतकऱयांनी अद्याप नुकसानभरपाई स्वीकारलेली नाही. व जादा नुकसानभरपाईसाठी अपिलही केले नाही. त्या शेतकऱयांनी लवकरात लवकर आपले दावे दाखल करावे, असे आवाहन जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी केली आहे.









