तालुक्यातील 118 जणांचा समावेश, सहा जणांचा मृत्यू
प्रतिनिधी/ बेळगाव
एकीकडे गणेश विसर्जनाची लगबग सुरू असताना मंगळवारीही पुन्हा कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला होता. जिल्हय़ात 505 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे धक्कादायक चित्र पहावयास मिळाले. यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 118 जणांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील 29 तर शहरी भागातील 89 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कर्नाटक राज्यात मंगळवारी एका दिवसात 5 हजार 159 जण कोरोनामुक्त झाले. तर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 2 लाख 54 हजार 626 इतकी आहे. राज्यात मागील 24 तासांमध्ये 9 हजार 58 नवे कोरोनाबाधित आढळून आले असून एकूण 90 हजार 999 जणांवर उपचार सुरू आहेत. संपूर्ण राज्यभरात एका दिवसात 135 जणांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण मृतांची संख्या 5 हजार 837 इतकी झाल्याची नोंद आहे. राज्यात 19 जणांचा मृत्यू इतर कारणांनी झाला असून ते कोविड पॉझिटिव्ह होते.
जिल्हय़ातील 95 जणांना पाठविले घरी
बेळगाव जिल्हय़ातील 95 जणांची मंगळवारी इस्पितळातून मुक्तता करण्यात आली. उपचार घेऊन बरे झाल्यामुळे त्यांना घरी पाठविण्यात आले असून काही काळ क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोरोनामुळे परिस्थिती बिघडल्याने तसेच श्वास घेण्यास त्रास होत असल्याने राज्यातील एकूण 762 जणांवर आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत. यामध्ये बेळगाव जिल्हय़ातील 21 जणांचा समावेश आहे.
बेंगळूर शहरातील 284 जणांवर आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत. श्वसनाचा त्रास होत असल्याने आयसीयुमध्ये दाखल करावे लागलेल्या रुग्णांमध्ये बेंगळूर शहर विभाग सर्वाधिक रुग्णसंख्येचा ठरला आहे. इतर जिल्हय़ातील ही संख्या 50 पेक्षा कमी आहे. हासन येथील 92 जणांवर आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत, असे सांगण्यात आले आहे.









