गृहमंत्र्यांची पोलीस प्रमुखांना सूचना
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या उद्देशाने बेळगावसह इतर जिल्हय़ांच्या सीमेवर आणखी कठोर उपाययोजना करण्याची सूचना गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना दिली आहे. गृहमंत्री बोम्माई यांनी सोमवारी रात्री उशिरा राज्याच्या सीमेवरील बेळगाव, बिदर, विजापूर, कोडगू, चामराजनगर, कारवार, मंगळूरसह सर्व जिल्हय़ांच्या जिल्हा पोलीस प्रमुखांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली.
महाराष्ट्र, केरळ राज्यातून कर्नाटकात प्रवेश करणाऱयांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याची खातरजमा करा. आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल पडताळूनच परराज्यातून येणाऱयांना प्रवेश द्या. जर त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली तर त्यांचे स्वॅब तपासण्यासाठी सीमेवरच व्यवस्था करा. त्यासाठी आरोग्य खात्याच्या अधिकाऱयांची मदत घ्या. परराज्यातील कोरोनाबाधित व्यक्ती कर्नाटकात प्रवेश करू नयेत यासाठी सर्व प्रकारची खबरदारी घेण्याची सूचना बोम्माई यांनी पोलीस अधिकाऱयांना दिली.
मागील वेळेस महाराष्ट्र आणि केरळ राज्यातूनच अधिक संख्येने बाधित कर्नाटकात आले होते. यावेळी त्याची पुनरावृत्ती होवू नये. बसने प्रवास करणाऱयांची तपासणी करा, अशी सूचनाही त्यांनी दिली. या बैठकीत पोलीस महासंचालक प्रवीण सूद, कायदा-सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रताप रेड्डी व इतर अधिकारी उपस्थित होते.









