रामनगर/ वार्ताहर
बेळगाव-गोवा महामार्गावरील अतिसंवेदनशील भागातील रस्त्याच्या कामाला न्यायालयाने स्थगिती दिली होती. या संदर्भाचा निर्णय 6 जानेवारीला लागण्याची शक्यता होती. पण आता निर्णयाला 31 जानेवारी ही पुढील तारीख मिळाली आहे. यामुळे सदर मार्गाचा निर्णय लांबणीवर पडला आहे.
या मार्गाचा निर्णय लवकर लागून धूळ व जीवघेणा प्रवासापासून सुटका होणार असे प्रवासी वर्गाला वाटत असतानाच निर्णय लांबणीवर पडल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. सदर मार्गावर काम करताना ठेकेदारांनी पर्यायी मार्गाची व्यवस्था केली नाही. तसेच असलेला मार्गही पूर्णता उखडून टाकला आहे. याबद्दल ठेकेदाराला विचारले असता दुरुस्तीची कोणतीच भूमिका घेत नाही. ठेकेदारांनी काम सुरू केल्यापासून या कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकाची वारंवार बदली करण्यात येत आहे. यामुळे रस्त्याचे काम रखडलेले दिसत आहे. यामुळे या भागातील नागरिक व प्रवासी या समस्येने त्रस्त झाले आहेत. या प्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधीचेही दुर्लक्षच आहे.









