वृत्तसंस्था/ लॉसेन
पुढीलवर्षी होणाऱया टोकियो ऑलिंपिक क्रीडास्पर्धेत तसेच इतर सर्व ऑलिंपिक संबंधित सर्व कार्यामध्ये बेलारूस ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष ऍलेक्झांडर लुकाशेंको यांच्या सहभागावर आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेने बंदी घातली आहे.
बेलारूस ऑलिंपिक समितीचे लुकाशेंको हे तब्बल 23 वर्षे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. गेल्या ऑगस्टमध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या सहाव्या निवडणुकीत त्यांच्याकडून अनेक भ्रष्टाचाराच्या घटना घडल्याच्या तक्रारी बेलारूसच्या बऱयास ऍथलीट्सनी आयओसीकडे केल्या. सुरक्षा दलाचा वापर करत लुकाशेंको यांनी सहाव्यांदा पुन्हा आपल्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे राहण्यासाठी प्रयत्न केले. सोमवारी झालेल्या आयओसी कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये बेलारूसच्या ऑलिंपिक समिती अध्यक्षानी राजकीय हस्तक्षेपाचा वापर केल्याचे आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी सांगितले. दरम्यान आगामी टोकियो आलिंपिकच्या पूर्वतयारीसाठी बेलारूसच्या ऍथलीट्सना आयओसीकडून आर्थिक मदत यापुढेही चालू राहील पण ही मदत या ऍथलीट्सना शिष्यवृत्तीच्या रूपात थेट दिली जाईल, असेही बाक यांनी सांगितले.









