प्रियंका वड्रा यांचे खटीमामधील सभेत भाजपवर टीकास्त्र
उत्तराखंडमधील खटीमा या मतदारसंघात काँग्रेस महासचिव प्रियंका वड्रा यांनी शनिवारी प्रचारसभा घेतली आहे. ही निवडणूक बेरोजगारीपासून मुक्तता मिळवून देणारी आहे. मागील 5 वर्षांमध्ये मुलांचे वय निघून गेले, परंतु रोजगार मिळालेला नाही. काँग्रेस उमेदवार हा गरीबाचा पुत्र आहे. तर भाजप अखेरच्या दोन दिवसांममध्ये मते विकत घेणार असल्याचे सांगत आहे. परंतु खटीमाचे लोक विकाऊ आहेत का असे विधान करत प्रियंका यांनी भाजपला लक्ष्य केले आहे.
5 वर्षांमध्ये भाजपने किती जणांना रोजगार दिला हे सांगावे. रोजगार, महामाई आणि शेतकऱयांचे प्रश्न हे येथील सर्वात मोठे मुद्दे आहेत. खटीमा हा मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असल्याने येथे विकास झाल्याचे वाटत होते. परंतु येथील खराब रस्ते पाहता 5 वर्षांमध्ये काहीच झालेले नाही. खटीमा हा मतदारसंघ उत्तरप्रदेशला लागून आहे. येथील गहू, ऊस आणि भाताला योग्य दर मिळत नाही. याचमुळे शेतकऱयांनी आंदोलन केले, शेतकरी हुतात्मा झाले. परंतु कुणीच त्यांची विचारपूस केली नाही. सरकार केवळ दोन जणांसाठी सर्व धोरणे आखत असल्याचा आरोप प्रियंका यांनी केला आहे.

नोटाबंदीनंतर सरकारने जीएसटी थोपविला. त्यानंतर कोरोना संकट आल्यावर सर्वात अधिक नुकसना छोटय़ा व्यापाऱयांचे झाले. सर्वाधिक रोजगार हे छोटे व्यापारी देतात, अंबानी किंवा अदानी नव्हे. भाजप याबद्दल न बोलता जनतेसमोर धर्माचे मुद्दे आणत आहे. नेत्याचा धर्म हा जनतेचा विकास असतो. उत्तराखंडमध्ये कौशल्य आणि साधनसंपत्ती आहे. परंतु रोजगार नाही असे त्या म्हणाल्या.
कोरोना संकटात सरकारने लोकांना देवाच्या भरवशावर सोडले होते तेव्हा काँग्रेसने मदत केली. मदतकार्यात कुठलेच राजकारण केलेले नाही. 5 वर्षांमध्ये काय झाले हे विसरू नका असे लोकांना सांगण्यासाठी दिल्लीमधून आले आहे. जनता संकटात असताना मुख्यमंत्री कुठे होते हा प्रश्न विचारा असे आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले आहे.









