पोलीस प्रशासनाने शिस्त लावण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
राष्ट्रीय महामार्गानजीक असलेल्या बेन्नाळी संपर्क रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे इतर वाहनांना ये-जा करणे अडचणीचे बनले आहे. मागील काही दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक आणि इतर वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पोलीस प्रशासनाने या वाहनांना शिस्त लावावी, अशी मागणी होत आहे.
राष्ट्रीय महामार्गावर धावणारी अवजड वाहने धाबा, हॉटेल, पेट्रोलपंप आणि इतर कारणांसाठी मार्गावरच थांबविली जात आहेत. काही वाहने रात्रभर संपर्क रस्त्यावरच थांबविली जात आहेत. त्यामुळे एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. काही वेळा वाहतूक कोंडीही निर्माण होत आहे. त्यामुळे संपर्क रस्त्याच्या प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण होत आहे. राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱया अवजड वाहनांची संख्या अधिक आहे.
दरम्यान, हॉटेल आणि धाब्यांवर जेवणासाठी आणि पेट्रोलपंपावर इंधन भरण्यासाठी ही अवजड वाहने रस्त्यावरच थांबविली जातात. काही ठिकाणी गॅरेजजवळ या वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. त्यामुळे शहरापासून जवळ असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर प्रवास धोक्मयाचा बनत आहे.
संपर्क रस्त्यावर वाहने लावली जात असल्याने इतर वाहनांना ये-जा करणे कठीण बनत आहे. शिवाय वाहनांच्या रांगा लांबच लांब लागत असल्याने समोरून येणारी वाहने नजरेस येत नाहीत. त्यामुळे लहान-सहान अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने लक्ष ठेवून या वाहनांना शिस्त लावावी, अशी मागणी होत आहे.









