पाठिमागील दरवाजा फोडून दागिने पळविले
प्रतिनिधी/ बेळगाव
बेनकनहळ्ळी (ता. बेळगाव) येथे एका बंद घराचा पाठिमागील दरवाजा फोडून सुमारे दीड लाखांचा ऐवज पळविण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी 2.15 वाजण्याच्या सुमारास चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे.
वसंत पाटील यांच्या घरी चोरीचा प्रकार घडला आहे. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास वसंत गवंडी कामाला गेले. त्यानंतर त्यांची पत्नी व मुलगा शेवयाच्या मशिनकडे गेले. दुपारी 2.15 वाजता जेवणासाठी ते घरी परतले त्यावेळी हा चोरीचा प्रकार उघडकीस आला.
चोरटय़ांनी पाठिमागील दरवाजा फोडून 5 नोळे सोन्याचे दागिने, 20 तोळे चांदी असा सुमारे दीड लाख रुपयांहून अधिक किंमतीचा ऐवज पळविला आहे. घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक आनंद व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी पोलिसांनी पंचनामा केला. यासंबंधी रात्री उशीरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती..









