वार्ताहर / दाभाळ
पाईकवाडा-बेतोडा येथे रस्त्याच्या बाजूला धोकादायक स्थितीत असलेले झाड दुसऱया झाडासह रस्त्यावर कोसळले. सकाळी 9 वा. सुमारास घडलेल्या या घटनेमुळे दाभाळ-निरंकाल, फोंडा मार्गावरील वाहतूक साधारण अडीच तास खोळंबून राहिली. सुदैवाने यावेळी रस्त्यावर एकही वाहन नसल्याने मोठा अपघात टळला. वीज वाहिन्यावर ही झाडे पडल्याने प्रवाह खंडित झाला.
पाईकवाडा-बेतोडा येथील ही दोन्ही झाडे धोक्याच्या स्थितीत असल्याचे वृत्त महिन्याभरापूर्वीच प्रसिद्ध झाले होते. पंचायतीने किंवा वनखात्याने ती तातडीने कापून टाकण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र याकडे कुणीच लक्ष न घातल्याने बुधवारी सकाळी जोरदार वाऱयामुळे ती रस्त्यावर केसळून पडली. दाभाळ-निरंकाल, बेतोडा मुख्यरस्त्यावरील वाहतूकीत अडथळा आल्याने वाहने कसमशेळ-कोडार मार्गे वळवावी लागली. सरपंच विशांत गावकर यांनी मदतकार्य करुन वीज कर्मचाऱयांच्या सहकार्याने ही झाडे बाजूला हटविली व रस्ता मोकळा केला.









