वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया
इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेत महिलांमधील विद्यमान विजेती पॉला बेडोसाने उपांत्यपूर्व फेरी गाठताना अमेरिकन ओपन उपविजेती लैला फर्नांडेझचा पराभव केला. याशिवाय सिमोना हॅलेप व इगा स्वायटेक यांनीही आगेकूच केली तर जर्मनीच्या अँजेलिक केर्बरचे आव्हान संपुष्टात आले.

बेडोसाने कॅनडाच्या फर्नांडेझवर 6-4, 6-4 असा विजय मिळविला. तिची पुढील लढत व्हेरोनिका कुडरमेटोव्हा किंवा मर्केटा व्होन्ड्रूसोव्हा यापैकी एकीशी होईल. पोलडंच्या तिसऱया मानांकित इगा स्वायटेकने माजी अग्रमानांकित जर्मनीच्या अँजेलिक केर्बरवर 4-6, 6-2, 6-3 अशी मात केली. तिची उपांत्यपूर्व लढत मॅडिसन कीजशी होईल. रोमानियाच्या सिमोना हॅलेपने आगेकूच करताना आपल्याच देशाच्या सोराना सिर्स्टियाचा 6-1, 6-4 असा पराभव केला. पेत्रा मार्टिकशी तिची लढत होईल. मार्टिकने ल्युडमिला सॅमसोनोव्हाचा 7-6 (8-6), 6-4 असा दोन तास रंगलेल्या लढतीत पराभव केला. सलग तिसऱया सामन्यात मार्टिकने पिछाडीवर राहिल्यानंतरही विजय मिळविला आहे.









