खानापूर-यल्लापूर राज्य मार्गावर वाढले अपघात : नादुरुस्त रस्ता तितकाच कारणीभूत, चालकांना सूचना देणे गरजेचे
बातमीदार /खानापूर
खानापूर-यल्लापूर हा राजमार्ग खानापूर तालुक्मयातील महत्त्वाचा राज्यमार्ग म्हणून ओळखला जातो. खानापूर तालुक्मयातील निम्म्याहून अधिक गावांचा संपर्क या रस्त्याशी येतो. त्यामुळे या रस्त्यावर रहदारी मोठय़ा प्रमाणात असते. अरुंद रस्ता असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अशातच भरधाव वेगाने जाणारी वाहने व बेजबाबदार बसचालक यामुळे खानापूर-हल्याळ या दरम्यान वारंवार अपघात घडत आहेत.
खानापूर-यल्लापूर राज्यमार्गालगत करंबळ, कौंदल, नावगा, लालवाडी, हेब्बाळ, नंदगड, कसबा नंदगड, गर्बेनहट्टी, झुंजवाड, बेकवाड, कुणकीकोप, गोलिहळ्ळी, गष्टोळी, भुरुणकी, रामापूर, लिंगनमठ आदी गावे येतात. शिवाय परिसरातील गावांचाही संपर्क या रस्त्याशी येतो. बेळगाव-मंगळूर, बेळगाव-यल्लापूर, बेळगाव, कारवार, खानापूर, कित्तूर, हलशी, नागरगाळी या गावांचा संपर्क याच रस्त्यावरून होतो. खानापूर, बेळगाव, हल्याळ, धारवाड, दांडेली आदींसह अन्य आगाराच्या बसेस या रस्त्यावरून नेहमी धावत असतात. बसचालक भरधाव वेगाने बस चालवत असतात. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच अनेक अपघात घडत आहेत.
खानापूर-हल्याळ रस्त्याचीही दुर्दशा
खानापूर-हल्याळ हा रस्ता पूर्णपणे खराब झाल्याने या भागातील प्रवासी, नागरिकांतून व विद्यार्थ्यांतून वारंवार मागणी करूनदेखील याबाबत काहीच ठोस भूमिका शासनाकडून घेतली जात नाही. यामुळे संतापाची लाट निर्माण झाली आहे.
खानापूर-यल्लापूर राज्यमार्गाचे 2007 साली रुंदीकरण करून नव्याने रस्ता करण्यात आला. मात्र वनखात्याच्या तांत्रिक अडचणीमुळे हा रस्ता वाहतुकीस हवा तितका रुंद करता आला नाही. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक मोठय़ा प्रमाणात असून देखील हा रस्ता रुंद करण्यात आला नाही. शासनाने याबाबत पाठपुरावा करून हा रस्ता निदान दोन गाडय़ा योग्यरीतीने ये-जा करतील इतका तरी रुंद करण्यात यावा, अशी मागणी या भागातील नागरिक सातत्याने करीत आहेत.
50 कि. मी.चा रस्ता पूर्णपणे खराब
खानापूर-हल्याळ हा रस्ता वळणदार असल्याने वेगात आलेल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात होतात. खानापूर ते हल्याळ हा 50 कि. मी. चा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे. मात्र हा रस्ता नव्याने करण्यात आलेला नाही. याबाबत खानापूर बांधकाम खात्याचे श्री. हलगी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी खानापूर हद्दीतील 34 कि. मी. रस्त्याच्या पुनर्बांधणीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. यासाठी बिडी ते लिंगनमठ या 4 कि. मी. च्या रस्त्यासाठी 5 कोटी मंजूर झाले आहेत तर खानापूर ते बिडी या रस्त्यासाठी 15 कोटीचा आराखडा करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. हा निधी मंजूर झाल्यानंतर खानापूर ते लिंगनमठ या 34 कि. मी. च्या रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल. अलीकडेच खराब झालेल्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगण्यात आले.









