लंडन / वृत्तसंस्था :
युरोपीय महासंघाच्या संसदेने ब्रेक्झिट कराराला बुधवारी मंजुरी दिली आहे. आता 31 जानेवरी रोजी ब्रिटन युरोपीय महासंघातून अधिकृतपणे बाहेर पडणार आहे. चार वर्षे चाललेल्या घडामोडीनंतर युरोपीय महासंघाच्या संसदेने 49 विरुद्ध 621 मतांच्या बहुमताने ब्रेक्झिट करारावर शिक्कामोर्तब केले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युरोपीय महासंघाच्या 27 नेत्यांशी चर्चा करून या कराराला अंतिम स्वरुप दिले होते.
ब्रिटनमध्ये 800 हून अधिक भारतीय कंपन्या असून त्यांच्याकडून 1 लाख 10 हजार जणांना रोजगार प्राप्त होतो. यातील निम्म्याहून अधिक जण केवळ टाटा समुहाच्या 5 कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. बेक्झिटनंतर ब्रिटनचे चलन असलेल्या पाउंडमध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत ब्रिटनशी व्यापार करणाऱया भारतीय कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
ब्रिटनने जून 2016 मध्ये झालेल्या सार्वमत चाचणीत बेक्झिटला मंजुरी दिली होती. पण ब्रिटन चालू वर्षाच्या अखेरपर्यंत युरोपीय महासंघाच्या आर्थिक व्यवस्थेत सामील राहणार आहे. पण ब्रिटनचा धोरणात्मक विषयांमुळे कुठलाच हस्तक्षेप नसेल तसेच त्याचे महासंघाचे सदस्यत्व संपुष्टात येणार आहे.