मडगाव पालिका मुख्याधिकाऱयांचे निर्देश, घाऊक मासळी मार्केटबाहेर तसेच पश्चिम बगलमार्गावर विक्री
प्रतिनिधी / मडगाव
एसजीपीडीए घाऊक मासळी मार्केटमध्ये कोरोना प्रकरणे आढळून येऊ लागल्यामुळे मासेविक्री बंद ठेवण्याचे निर्देश प्राधिकरणाने दिले आहेत. त्यामुळे किरकोळ व घाऊक विपेते आता आपला व्यवसाय करण्यासाठी मार्केटच्या बाहेरचा भाग वा पश्चिम बगलरस्त्याचा वापर करत असून यामुळे कोविड एसओपीचे उल्लंघन होत असल्याने मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी मार्केट निरीक्षकांना आज शुक्रवारी पहाटे 5 पासून कारवाई करण्याचे लेखी निर्देश दिले आहेत.
गुरुवारी सकाळी मडगावचा घाऊक मासळी बाजार बंद होता. मडगाव व आसपासच्या भागांतील बाधितांच्या संख्येमध्ये होणारी वाढ लक्षात घेऊन प्राधिकरणाचे अध्यक्ष विल्प्रेड डिसा यांनी घाऊक मासळी बाजार बंद ठेवण्याचे निर्देश नुकतेच दिले होते. विक्रेत्यांकडून बाजारपेठेत ‘एसओपी’चे पालन केले जात नाही आणि गर्दीमुळे कोविडचा प्रसार होण्याची शक्मयता असल्यामुळे ही बंदी लागू केली होती. गुरुवारी बाजार बंद असल्याचे दिसून आले, परंतु मासे आणणाऱया काही विक्रेत्यांनी माशांचा बाजार कोणत्याही सामाजिक अंतराशिवाय नवीन पश्चिम बगलमार्गावर अवैधपणे हलविला असल्याचे आढळून आले.
विपेत्यांनी नवीन पश्चिम बगलमार्गाच्या दोन्ही बाजूला माशांचे ट्रक उभे केले होते आणि कोणतेही सामाजिक अंतर न ठेवता रस्त्यावर मासे विकले जात होते. पोलिसांनी या बेकायदा व्यवसायाकडे कानडोळा केल्याचे दिसून आले. एसजीपीडीए घाऊक मार्केटजवळही काही प्रमाणात किरकोळ मासेविक्री होत असल्याचे दिसून आल्याने तसेच रावणफोंड येथे एसओपीला हरताळ फासून मासेविक्री होत असल्याने मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी मार्केट निरीक्षकांना वरील निर्देश दिले आहेत. फातोर्डा व मडगाव पोलिसांना कारवाईच्या वेळी पोलीस संरक्षण पुरविण्यास लिहिले असल्याची माहिती फर्नांडिस यांनी दिली.









