अथणी तालुक्मयात अधिकाऱयांची कारवाई
प्रतिनिधी/ अथणी
तलावातील पाण्याचा केवळ पिण्यासाठी वापर करावा, अशी सूचना तहसीलदारांनी देऊनही यलमनवाडी येथील काही शेतकरी पंपसेटद्वारे तलावातील पाण्याचा उपसा करून त्याचा शेतीसाठी वापर करत होते. याची माहिती मिळताच विविध खात्याच्या अधिकाऱयांनी धाड टाकून सदर पंपसेट व साहित्य जप्त केले. सदर कारवाई शनिवारी दुपारी करण्यात आली.
यलमनवाडी येथील तलावातून 25 शेतकरी पंपसेटद्वारे पाण्याचा उपसा करून शेतीसाठी वापरत होते. यापूर्वीच नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी तहसीलदारांनी तलावाच्या पाण्याचा पिण्यासाठीच वापर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र या सूचनेकडे दुर्लक्ष करत सदर शेतकऱयांनी तलावातील पाण्याचा शेतीसाठी वापर करत होते. याची माहिती मिळताच महसूल, लघु पाटबंधारे, पोलीस, हेस्कॉम अधिकारी व कोकटनूर ग्राम पंचायतने धाड टाकून पंपसेट जप्त करत साहित्यही ताब्यात घेतले. तर काही शेतकऱयांना याचा सुगावा लागताच त्यांनी पंपसेट घेऊन पळ काढला आहे. या कारवाईत लघु पाटबंधारे निरीक्षक शरणाप्पा मुधोळ, सदाशिव सवदी, ग्रामलेखाधिकारी कलमेश कलमडी, रमेश कोन्नूर, राजू कांबळे, खादीर मुल्ला, परशुराम मादर, श्रवणकुमार कोन्नूर, आय. डी. बिरादार आदी सहभागी झाले होते.









