प्रतिनिधी /पणजी
ताळगाव येथे बेकायदेशीररित्या डोंगरकापणी करून पर्यावरणाचा ऱहास केल्याबद्दल अज्ञात व्यक्तीविरोधात वनखात्यात काँग्रेसचे ताळगावचे नेते टोनी रॉड्रीग्ज यांनी तक्रार दाखल केली आहे. आशामहालनंतरच्या मुख्य रस्त्यावरील सॅटिस्मोवाडो येथे बेकायदेशीररित्या रस्ता आणि डोंगरकापणीचे काम सुरू आहे. याकडे पंचायतीने दुर्लक्ष केले असून वनखात्याने हे बेकायदेशीर बांधकाम त्वरित थांबवावे, अशी मागणी टोनी रॉड्रीग्ज यांनी यावेळी केली. चार दिवसांपूर्वीपासून डोंगरकापणीचा विषय सॅटिस्मोवाडा येथे सुरू असून एका खाणीमध्ये पोहोचल्याचा आभास झाला. मंत्री जेनिफर मोन्सेरात यावर लक्ष देतील अशी आशा होती परंतु यावर पंचायत व मंत्र्यांनी काहीच लक्ष न दिल्यामुळे आम्हाला तक्रार करण्यासाठी वनखात्याकडे यावे लागले. डोंगरकापणी ही पंचायत ताळगावच्या आमदाराच्या आशीर्वादाने होत आहे. डोंगरकापणीमुळे अनेक झाडे कापली गेली. जिल्हाधिकारी, ग्रेटर पीडीए याठिकाणी तक्रार करण्यात येणार आहे. मोन्सेरात कुटुंबीय हे बिल्डरांसाठी काम करत आहेत. बेकायदेशीररित्या झाडे कापण्यात आली आणि पंचायत यावर काहीच कारवाई करत नाही, असा आरोप माजी महापौर उदय मडकईकर यांनी यावेळी केला.









