शिखांच्या सर्वात मोठय़ा संघटनेने संग्रहालयात लावली तसवी
वृत्तसंस्था / अमृतसर
मानवी बॉम्ब होऊन पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांचा जीव घेणाऱया दिलावर सिंह बब्बरची तसवीर अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या संग्रहालयात लावण्यात आली आहे. शिखांची सर्वात मोठी संस्था शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापक समितीकडून (एसजीपीसी) ही तसवीर मंगळवारी संग्रहालयात लावण्यात आली.
एसजीपीसीच्या या निर्णयामुळे वाद निर्माण झाला आहे. शिखांच्या कट्टरवादी गटांनी तसवीर लावण्याचे समर्थन केले आहे. तर हिंदुत्ववादी संघटनांनी याला चुकीचे ठरविले आहे. पंजाब पोलीस दलाचा कर्मचारी असलेल्या दिलावर सिंह बब्बरने 31 ऑगस्ट 1995 रोजी मानवी बॉम्ब होत तत्कालीन मुख्यमंत्री बेअंत सिंह यांच्या कारनजीक स्फोट घडवून आणला होता. त्यानंतर काही कट्टरवादी गटांनी दिलावर सिंह बब्बरला शहीदाचा दर्जा दिला होता. यापूर्वी शिखांची सर्वोच्च संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱया अकाल तख्तने 23 मार्च 2012 रोजी दिलावर सिंह बब्बरला कौमी शहिदाचा दर्जा दिला होता.
दिलावर सिंह बब्बर 1995 मध्ये शहीद झाले, 2012 मध्ये अकाल तख्तवर बलवंत सिंह राजोआनाला ‘जिवंत शहीद’ आणि दिलावर सिंह बब्बरला ‘अमर शहीद’चा दर्जा देण्यात आला. याच्या 10 वर्षांनी आता दिलावर सिंहची तसवीवर अजायबघरात (संग्रहालय) लावण्यात आल्याचे एसजीपीसीचे प्रमुख एच.एस. धामी यांनी म्हटले आहे.
हा शिख पंथातील अंतर्गत मुद्दा आहे. शिख पंथ अन्य कुठल्याही धर्मात हस्तक्षेप करत नाही. याचमुळे अन्य कुणी आमच्या विषयांमध्ये हस्तक्षेप करणार नाही अशी अपेक्षा असल्याचे धामी म्हणाले. दुसरीकडे प्रतिबंधित खलिस्तान समर्थक संघटना शिख्स फॉर जस्टिसचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नूने एसजीपीसीच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे.
सुवर्णमंदिर संग्रहालयात दिलावर सिंह बब्बरची तसवीर लावण्यावर 2017 मध्ये सहमती झाली होती. त्यावेळी पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल आणि भाजपचे आघाडी सरकार होते. अकाली दलाने एसजीपीसीच्या या निर्णयाला विरोध केला नाही. परंतु फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या पंजाब निवडणुकीत अकाली-भाजप आघाडी पराभूत होत राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले होते. त्यानंतर दिलावरची तसवीर संग्रहालयात लावण्याचा विषय बाजूला पडला होता.
विरोधात उच्च न्यायालयात जाऊ
हिंदू संघटना आणि अँटी टेररिस्ट प्रंड इंडियाचे अध्यक्ष वीरेश शांडिल्य यांनी बब्बर खालसाचे दहशतवादी पुन्हा पंजाबच्या शांततेला धक्का पोहोचवू पाहत असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याची दखल घ्यावी. देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वावर प्रेम करणारे आणि सरदार बेअंत सिंह यांच्या विचारसरणीचे अनुसरण करणाऱयांना यामुळे धक्का बसला आहे. एसजीपीसीने दिलावरची तसवीर न हटविल्यास आम्ही पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेऊ असे शांडिल्य यांनी सांगितले आहे.









