प्रतिनिधी/ बेंगळूर
मंगळूर विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आल्याची घटना ताजी असतानाच बेंगळूरच्या विवेकनगर येथे आयोजित कार्यक्रमात लहान स्फोट झाला या घटनेत शांतीनगरचे काँग्रेस आमदार एन. ए. हॅरिस यांच्यासह चौघेजण जखमी झाले. अचानक घडलेल्या स्फोटामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळावरून विधिविज्ञान प्रयोगशाळेच्या तज्ञांनी स्फोटक साहित्याचे नमुने घेतले आहेत.
विवेकनगर येथे वाढदिवस कार्यक्रमात आमदार हॅरिस सहभागी झाले होते. बुधवारी रात्री अचानक व्यासपीठाच्या दिशेने फेकलेल्या वस्तूचा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता अधिक नसल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर पोलिसांची तुकडी, श्वानपथक घटनास्थळी तपास करण्यासाठी दाखल झाले. जखमी हॅरिस व मोहन, चिट्टीबाबू संपत या तिघांना सेंट फिलोमिना इस्पितळात दाखल करण्यात आले. स्फोटाचे स्पष्ट कारण उलगडलेले नाही. स्फोट झालेली वस्तू गावठी बॉम्ब असल्याची शंका हॅरिस यांच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे.
घटनेविषयी माहिती देताना आमदार हॅरिस यांचे पुत्र नलपाड यांनी आपले वडील कार्यक्रमात अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी हिरव्या रंगाच्या प्लास्टिकमध्ये बांधलेली वस्तू भिरकावण्यात आली. त्या वस्तूचा अचानक स्फोट झाला. यामागे कारस्थान असावे, अशी शंका उपस्थित केली.









