बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर शहरात गेल्या महिन्यात झालेल्या वादग्रस्त फेसबुक पोस्टनंतर केंद्रीय गुन्हे शाखेने डीजे हळ्ळी आणि केजी हळ्ळी भागातील हिंसाचाराच्या प्रकरणात माजी महापौर संपत राज यांना चौकशीसाठी पुन्हा नोटीस बजावली आहे.
संपत राज हे बृह बेंगळूर महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक ४७ डीजे हळ्ळीचे नगरसेवक आहेत. या प्रकरणात दुसऱ्यांदा त्यांना नोटीस बजावून चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे.
१७ ऑगस्ट रोजी सीसीबीने संपत राज यांची बराच वेळ चौकशी केली, यावेळी त्यांचा मोबाइल फोन तपासासाठी ताब्यात घेण्यात आला होता. त्याचबरोबर या प्रकरणी पुलकेशीनगर येथील प्रभाग क्रमांक ७ चे नगरसेवक अब्दुल रकीब झाकीर यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार राजच्या मोबाइल फोनमध्ये अशी काही माहिती मिळाली असून, त्याविषयी त्यांची चौकशी केली जाणार आहे.









