बेंगळूर/प्रतिनिधी
कन्नड चित्रपट इंडस्ट्रीमध्ये सुरु असलेली मादक पदार्थांची तस्करी आणि सेवन याविषयी पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. चित्रपट निर्माता इंद्रजित लंकेश यांनी ड्रग्ज तस्कर प्रकरणी गंभीर आरोप केल्यानंतर सीसीबी पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान करत काही जणांना अटक केली होती. यापैकीच फरारी असलेला संशयित आरोपी अश्विन भोगी याला बेंगळूर सेंट्रल क्राइम ब्रँचने (सीसीबी) मंगळवारी चिक्कमंगळूर येथून ड्रग तस्कर प्रकरणात अटक केली. अश्विन भोगी हा काही महिन्यापासून फरार होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु होता.
गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप पाटील यांनी आरोपी अश्विन भोगी याला चिक्कमंगळूर येथून ताब्यात घेतले असून त्याला पुढील चौकशीसाठी बेंगळूरला आणल्याचे म्हंटले.
सीसीबीने ड्रग तस्कर प्रकरणात निलंबित आरटीओ लिपिक बी. के. रवि शंकरला अटक केल्यांनतर अटक केल्यानंतर भोगी फरार झाला होता. बेंगळूरच्या कॉटनपेट पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या एफआयआरमध्ये भोगी हा नऊ नंबरचा आरोपी असल्याचे नमूद आहे. पोलिसांनी त्याला कोर्टासमोर हजर केले व पुढील चौकशीसाठी सात दिवसांची पोलीस कोठडी घेतली. सीसीबी पोलिसांनी तत्पूर्वी याच प्रकरणात कन्नड अभिनेता रागिनी द्विवेदी आणि संजना यांना अटक केली होती.









