प्रतिनिधी / बेंगळूर
बेंगळूर शहरात कोरोनाची दुसरी लाट मोठय़ा प्रमाणात पसरत आहे. या पार्श्वभूमीवर गर्दी होणारी ठिकाणे टप्प्याटप्प्याने बंद करून बाहेरून येणाऱया प्रवाशांना घरातच क्वॉरंटाईन करण्याचा विचार सुरू आहे, असे बेंगळूर महापालिकेचे आयुक्त गौरव गुप्ता यांनी सांगितले. महापालिकेच्या कार्यालयात कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
गौरव गुप्ता पुढे म्हणाले, कोणत्याही ठिकाणाहून बेंगळूर शहरात आलेल्या प्रवाशाने आपल्या घरातच क्वॉरंटाईन होऊन कोरोनाची चाचणी करून घ्यावी. दरम्यान, अहवाल निगेटिव्ह आल्यासच शहरात फिरण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. याला अनुमती मिळाल्यास बुधवारपासून हा नियम जारी केला जाईल. याचबरोबर गर्दीच्या ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे महापालिकेने याकडे गंभीर्याने लक्ष दिले असून कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास सदर ठिकाण बंद करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. दररोज शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे शहरातील खासगी रुग्णालयांना 20 टक्के बेड राखीव ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.









