बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर ट्रॅफिक पोलीस (बीटीपी) च्या पश्चिम विभागाने जाहीर केले आहे की वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत यासाठी विशेष मोहीम या आठवड्यात राबविली जाणार आहे. पोलीस उपायुक्त (ट्रॅफिक वेस्ट) कुलदीपकुमार आर. जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनचालकांनी हेल्मेट वापरणे, सीट बेल्ट वापरणे आणि वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर टाळणे यासाठी मोहीम राबविण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. तसेच जे कोणी या नियमांचे पालन करणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, जैन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्हाला जास्त प्रमाणात या नियमांचे उल्लंघन होणार नाही अशी आशा आहे. तसेच लोक वाहतुकीच्या नियमांचे पालन करतील अशी खात्री आहे. तसेच वाहनचालक स्वतःचा जीव धोक्यात घालणार नाहीत. यासाठी ते वाहतुकीच्या नियमांचे पालन करतील.
दरम्यान, वाहतूक पोलीस नेहमीच वाहनचालकांना शिस्त लावण्याचे काम करत असतात. मात्र प्रत्येक वाहनचालकास आपण एकटेच नीट वाहन चालवत असून अन्य कोणाकडेच हे कसब नसल्याची खात्री असते. बऱ्याच वेळेला हे लोक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वाहन चालवत असतात. बऱ्याच वेळेला नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करताना दिसतात. तरीही लोक याकडे दुर्लक्ष करत असतात. आता बेंगळूर ट्रॅफिक पोलीस वाहनचालकांनी नियम पाळावे यासाठी विशेष मोहीम सुरु करणार आहे.









