बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात सीसीबी पोलिसांकडून ड्रग प्रकरणाची चौकशी सुरु आहे. या ड्रग प्रकरणामध्ये कन्नड अभिनेते, अभिनेत्री सामील आहेत. दरम्यान या प्रकरणाची चौकशी सुरु असताना आरोपींच्या साथीदारांना ड्रग प्रकरणाच्या चौकशीची माहिती लीक केल्याच्या आरोपाखाली बेंगळूर पोलिसांनी बुधवारी केंद्रीय संरक्षण गुन्हे शाखेच्या महिला संरक्षण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त एम. आर. मुधवी आणि हेड कॉन्स्टेबल मल्लिकार्जुन यांना निलंबित केले आहे.
याविषयी बोलताना गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी चौकशी दरम्यान असे आढळले की दोघे आरोपींच्या काही साथीदारांच्या संपर्कात होते आणि तपासाची माहिती देत होते. अंतर्गत चौकशीचा अहवाल बेंगळूर शहर पोलीस आयुक्त कमल पंत यांना देण्यात आला आहे. अहवालाच्या आधारे सरकारने बुधवारी दोघांना निलंबित केले असल्याचे त्यांनी सांगितले.