बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक पोलिसांच्या केंद्रीय गुन्हे शाखेने शहर पोलीस आयुक्त कमल पंत यांच्या आदेशानुसार दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केलेल्यांची चौकशी केली जात आहे. कोविड बेड वाटप घोटाळ्याप्रकरणी चार आरोपींची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. आरोपी आर्थिक परिस्थिती पाहून रुग्णांना बेड उपलब्ध करून देत होते. संबंधित व्यक्ती २ लाख ते ४ लाख रुपये घेऊन बेड देत होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली होती.
सह पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या गुन्ह्याचा मुख्य संशयित व्यक्तीला ओळखले आहे. “आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची चौकशी केली आहे. यामध्ये रोहित कुमार, नेत्रावती, रिहान आणि शशी कुमार यांच्या चौकशी दरम्यान आम्ही एका मुख्य संशयिताची ओळख पटवली. बेड वाटप घोटाळ्यासंदर्भात कक्षातील डॉक्टर, रूग्णालयातील कर्मचारी आणि अन्य कर्मचारी यांच्यासह एकूण १८ जणांची चौकशी करण्यात आली.
दरम्यान आतापर्यंत अटक केलेले आरोपी पुढील १४ दिवस पोलीस कोठडीत राहतील. “वॉर रूममधून गोळा केलेला तांत्रिक डेटा स्कॅन करण्याची प्रक्रिया सुरू राहील. गेल्या महिन्यात केलेल्या सर्व खाट वाटपाची तपासणी केली जात आहेत, ”असे त्यांनी स्पष्ट केले.









