वृत्तसंस्था/ बेंगळूर
बेंगळूर एफसीने आपल्या ताफ्यात जमैकाचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू डेशॉर्न ब्राऊनचा समावेश केला असून बुधवारी क्लबने त्याला दीड वर्षांसाठी करारबद्ध केले आहे. 2020-21 च्या मोमसाअखेरपर्यंत तो या संघातून खेळणार आहे.
मिडफिल्डमध्ये तो खेळत असून विंगर म्हणूनही तो सहजतेने खेळतो. बेंगळूर एफसीसाठी तो महत्त्वाचा खेळाडू ठरणार आहे. आयएसएलमध्ये सध्या बेंगळूर एफसी संघ दहा फेऱयानंतर तिसऱया स्थानावर आहे. ‘आम्हाला सातवा विदेशी खेळाडू सामील करून घेण्याचा पर्याय होता. त्याचा उपयोग करण्याची ही वेळ असल्याचे आम्हाला वाटल्याने आम्ही ब्राऊनला करारबद्ध केले. संघाला जे ध्येय गाठायचे आहे, ते गाठण्यात तो संघाला मोलाची मदत करेल, अशी आमची खात्री आहे,’ असे या क्लबचे प्रमुख प्रशिक्षक कार्लेस क्वाड्राट म्हणाले.
अमेरिकेत कॉलेज फुटबॉल खेळल्यानंतर ब्राऊन 2011 मध्ये व्यावसायिक क्षेत्रात प्रवेश केला. त्याने युनायटेड सॉकर लीगमध्ये देस मोइनेस मेनासचे प्रतिनिधित्व केले आहे. अमेरिका, नॉर्वे, चीन व स्पेन या तीन खंडातील चार देशात खेळल्यानंतर ब्राऊन भारतीय वातावरणाशी लवकरात लवकर जुळवून घेईल, अशी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. या संघाचे प्रतिनिधित्व करणारा ब्राऊन हा कॅरिबियन बेटातील दुसरा खेळाडू आहे. याआधी त्रिनिदाद-टोबॅगोच्या कॉर्नेल ग्लेनने या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.









