बेंगळूर/प्रतिनिधी
गुरुवारपासून बेंगळूर शहराच्या रस्त्यावर इलेक्ट्रिक बस शहरातील मार्गावर धावताना दिसतील. बेंगळूर मेट्रो ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (बीएमटीसी) या बसेस चालवणार आहे. सकाळी दहा वाजता शांतीनगर येथील बीएमटीसीच्या मुख्यालयापासून बसेसचे पूजन झाल्यानंतर शहर मार्गावर बसेस धावतील.
भारत सरकारच्या अवजड उद्योग खात्याच्या विविध महामंडळांनी वित्तीय प्रोत्साहन योजनेंतर्गत बीएमटीसीला ३०० बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत. प्रति बसची किंमत ८८.३३ लाख आहे. केंद्र सरकारच्या २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात फेम २ अंतर्गत कर्नाटक सरकारच्या सहकार्याने बेंगळूरमध्ये इलेक्ट्रिक बस चालविण्यास मान्यता देण्यात आली. कर्नाटक सरकारने पाचशे बससाठी शंभर कोटी रुपयांची घोषणा केली होती. भारत सरकारच्या अवजड उद्योग विभागाला ३१ डिसेंबर २०२० पर्यंत सर्व बसचा पुरवठा करावा लागणार आहे.
बीएमटीसीकडून मिळणारी वातानुकूलित इलेक्ट्रिक बसमध्ये ३५ प्रवासी बसण्याची क्षमता असेल. महत्वाची बाब म्हणजे ही बस स्वयंचलित गीयरलेस असेल. एकदा चार्जिंग केल्यानंतर ही बस २०० ते २५० किमी पर्यंत चालविली जाऊ शकते. बसमध्ये यूएसबी चार्जिंग, इमर्जन्सी अलार्म, स्टॉप बटण, प्रथमोपचार किट, मोबाइल चार्जिंग, आपत्कालीन वेळी बाहेर पडण्याच्या सुविधेसाठी इतर वैशिष्ट्ये आहेत









