सेऊल/ वृत्तसंस्था
उत्तर कोरियाने पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. उत्तर कोरिया आपल्या शस्त्रास्त्रांची सातत्याने चाचणी करत आहे. उत्तर कोरियाने पूर्व समुद्रात बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्याचे सेऊलमधील जॉईंट चीफ ऑफ स्टाफने रविवारी जाहीर केले. आपल्या शस्त्रास्त्रांचे आधुनिकीकरण करणे आणि आण्विक मुत्सद्देगिरीमध्ये शत्रूराष्ट्रावर दबाव आणणे हा उत्तर कोरियाच्या चाचणीचा उद्देश आहे. अलीकडेच उत्तर कोरिया अण्वस्त्र चाचणी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱयांनी केला होता.
उत्तर कोरियाने मे महिन्याच्या अखेरीसही समुद्राच्या दिशेने तीन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे प्रक्षेपित करत चाचण्या केल्या होत्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सेऊल भेटीदरम्यान उत्तर कोरियाच्या आण्विक धोक्मयांना रोखण्यासाठी विस्तारित लष्करी सरावांवर विचार करण्यास सहमती दर्शविल्यानंतर हय़ा चाचण्या करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांनंतर दक्षिण कोरियाने आपली पाळत ठेवण्याची स्थिती अधिक सतर्क केली आहे.