थायलंडमध्ये एका बुडणाऱया जहाजात अडकून पडलेल्या मांजरांना वाचविण्यासाठी तेथील नौदलाने मोठी बचाव मोहीम राबविली आहे. समुद्रात बुडत चाललेल्या जहाजावर अडकून पडलेल्या प्राण्यांना वाचविण्यासाठी थायलंडच्या नौदलाच्या अधिकाऱयांनी दाखविलेल्या शूरतेची छायाचित्रे आता समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मांजरांच्या रक्षणासाठी पार पाडलेल्या या मोहिमेचे लोक प्रचंड कौतुक करत आहेत.
पॅराडाइज बेटानजीक एका बुडणाऱया जहाजात 4 मांजरांना सोडण्यात आले होते. या मुक्या प्राण्यांना वाचविण्यासाठी नौदलाने मोहीम हाती घेतली. या जहाजावर आग लागल्याने मोठे छिद्र पडले होते आणि याचमुळे त्यात पाणी भरू लागले होते. आग लागल्याने बुडणाऱया या जहाजातून इंधनाची तर गळती होत नाही ना याची खातरमजमा करण्यासाठी थायलंडचे नौदल तेथे पोहोचले होते. नौदलाचे पथक तेथे पोहोचताच त्यांना मांजराची चार पिल्ले दिसून आली.
पाण्यात उडी मारून वाचविला जीव
नौसैनिकांनी त्वरित समुद्रात उडी घेत या मांजरांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू केले. पेटत्या जहाजातून या चारही मांजरांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. या मांजरांना नौदलाच्या अधिकाऱयांनी स्वतःच्या नौकेवर खाऊ-पिऊ घातले आहे. आग लागल्याने बुडणाऱया जहाजावर असलेले 8 कर्मचारी नौदल पोहोचण्यापूर्वीच तेथून निसटले होते. या लोकांना एका मासेमारीच्या जहाजाने वाचविले होते.









