वार्ताहर / देवगड:
वाडा पुलावरून 31 वर्षीय परप्रांतीय महिलेला कणकवली-बांधकरवाडी येथील तुकाराम दत्ताराम पांगम (30) याने तब्बल 50 फूट उंच पुलावरून खाडीच्या पाण्यात फेकून दिले. या घटनेवेळी स्थानिक तिघांनी होडीच्या सहाय्याने या बुडणाऱया महिलेचे प्राण वाचविले. त्यांचा सत्कार देवगड पंचायत समितीच्यावतीने शुक्रवारी करण्यात आला.
महिलेचा प्राण वाचविणाऱयामध्ये लक्ष्मण वाडेकर, पुष्पकांत वाडेकर व वासुदेव कोयंडे यांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात बुडणाऱया महिलेला सुखरूप किनाऱयावर आणले. या तिघांच्या साहशी कामगिरीबाबत सर्वत्र कौतुक होत आहे. देवगड सभापती सुनील पारकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपसभापती डॉ. अमोल तेली, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहाय्यक गटविकास अधिकारी अरूण चव्हाण तसेच सर्व पंचायत समिती सदस्य, अधिकारीवर्ग आदी उपस्थित होते.









