माजी पंतप्रधानांनी घेतली शपथ : इम्रान खान यांना आव्हान
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मला तुरुंगात पाठविण्यासाठी जबाबदार लोकांनी ‘देशाला बुडविले आहे’ आणि त्यांची देशविरोधी कृत्ये आता चालू देणार नसल्याचे म्हटले आहे. पीएमएल-एनचे प्रमुख असलेल्या शरीफ यांनी पाकिस्तानच्या उत्तरदायित्व विभागाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या विभागाकडूनच शरीफ यांना दोषी ठरवून तुरुंगात डांबण्यात आले होते.
शरीफ यांनी स्वतःच्या ट्विटसह इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश शौकत अजीज सिद्दीकी यांची एक चित्रफित प्रसरित केली आहे. सिद्दीकी यांना राज्याच्या संस्थांच्या विरोधात वादग्रस्त भाषण केल्याप्रकरणी पदावरून हटविण्यात आले होते. या चित्रफितीत माजी न्यायाधीश अरशद मलिकही दिसून येतात. चित्रफितीत शरीफ यांना दोषी ठरविण्यासाठी दबाव आणला गेल्याचे ते मान्य करत असल्याचे दिसून येतात. या न्यायाधीशालाही पुढील काळात बडतर्फ करण्यात आले होते.
3 वेळा निवडून आलेल्या पंतप्रधानाला शिक्षा ठोठावून फरार घोषित केले जाते हीच उत्तरदायित्व विभागाची वस्तुस्थिती असल्याचे शरीफ यांनी नमूद केले आहे. तसेच त्यांनी जेयुआय-एफचे प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांच्याशी संपर्क साधून इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकार सत्तेबाहेर हाकलण्याच्या पर्यायांवर चर्चा केली आहे. दोन्ही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी नव्याने स्थापन पाकिस्तान डेमोक्रेटिक मूव्हमेंट (पीडीएम) आघाडीच्या प्रमुखाच्या नियुक्तीवरही चर्चा केली आहे.









